India vs Australia 1st Match: कोहली-रोहितशिवाय आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार टीम इंडिया; 'या' खेळाडूंवर खिळल्यात नजरा
India vs Australia: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना आज (22 सप्टेंबर) मोहालीत होणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या हे पहिले दोन सामने खेळणार नाहीत.
India vs Australia 1st Match: यंदा एकदिवसीय विश्वचषकाचं (ICC World Cup 2023) यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आजपासून ऑस्ट्रेलियासोबत (Australia) होणारे टीम इंडियाचे (Team India) सामने 'ड्रेस रिहर्सल' असल्याचं मानलं जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेत श्रेयस अय्यरला आपला मॅच फिटनेस सिद्ध करावा लागेल, तर सूर्यकुमार यादवला एकदिवसीय क्रिकेटमधील आपला खेळ सुधारावा लागणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (22 सप्टेंबर) मोहालीत खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार असून वनडे मालिकेतील सर्व सामने याच वेळेत खेळवले जाणार आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमधून 'हे' 4 दिग्गज बाहेर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या वनडे सीरिजसाठी घोषणा करण्यात आलेल्या टीम इंडियाच्या स्क्वॉडमधून टीम इंडियाच्या दिग्गज शिलेदारांना बाहेर ठेवण्यात आलं आहे. टीम इंडियाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली या दोघांसह स्टार स्पिनर कुलदीप यादव आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या या चौघांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशातच टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ तपासण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टीम इंडिया स्क्वॉडमध्ये मुंबईच्या दोन शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. टी20 चा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर हे दोघेही या सीरिजमध्ये टीम इंडियाचा भाग असणार आहेत. यावेळी दोन्ही खेळाडूंची सत्वपरिक्षा असणार आहे.
Mohali ✈️ Indore ✈️ Rajkot
— BCCI (@BCCI) September 21, 2023
The 3⃣ venues for the #INDvAUS ODI series starting tomorrow 🏆👌#TeamIndia pic.twitter.com/XEVhIFaNQk
श्रेयस अय्यर 6 महिन्यांहून अधिक काळ मैदानापासून दूर
28 वर्षीय श्रेयस अय्यरनं गेल्या सहा महिन्यांपासून फारसं क्रिकेट खेळलेलं नाही. स्ट्रेस फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेनंतर परतलेला श्रेयस अय्यर आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाठीच्या दुखण्यामुळे पुन्हा टीम इंडियातून बाहेर गेला होता. त्यावेळी त्याच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, अय्यर हे तिन्ही सामने खेळू शकतात, परंतु पुढील पाच दिवसांत होणाऱ्या तीन सामन्यांमध्ये तो पूर्ण 100 षटकं खेळू शकेल का? हे पाहणं बाकी आहे. विश्वचषकात मधल्या षटकांमध्ये स्पिनर म्हणून टीम इंडियाला श्रेयस अय्यरची गरज आहे.
सूर्यकुमार टी-20मध्ये नंबर वन बॅट्समन असू शकतो, पण वनडेमध्ये टी20 चा फॉर्म सूर्या अद्याप तरी रिपीट करू शकलेला नाही. आतापर्यंत 27 वनडे खेळलेल्या सूर्याचा एव्हरेज 25 आहे, यावरून त्याची क्षमता दिसून येत नाही. विश्वचषकाच्या प्राथमिक संघात त्याचा समावेश करण्यात आला असून आता त्याला निवड समितीच्या विश्वासावर खरं उतरावं लागणार आहे.
अश्विनसाठी विश्वचषकाचे दरवाजे खुले
स्टार स्पिनर अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे 37 वर्षीय रविचंद्रन अश्विनसाठी विश्वचषकाची दारं खुली झाली आहेत. अक्षर वेळेत दुखापतीतून सावरला नाही तर अश्विन कारकिर्दीतील तिसरा आणि शेवटचा विश्वचषक खेळू शकतो. दोन आठवड्यांपूर्वी संघ व्यवस्थापनाच्या विचारात अश्विन कुठेही नव्हता, पण आता संघात स्थान मिळवण्यासाठी त्याच्या आणि वॉशिंग्टन सुंदरमध्ये स्पर्धा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विननं आगामी तीन सामन्यांमध्ये चांगली खेळी केली नसली तरी विश्वचषकासाठी सुंदरपेक्षा त्याला प्राधान्य मिळू शकतं. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसोबत अश्विनची लढत रंजक ठरू शकते.
कुलदीप यादव आणि पांड्या यांच्या अनुपस्थितीत अश्विन आणि सुंदर या दोघांनाही स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असेल. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित खेळणार नसल्यामुळे ईशान किशन आणि शुभमन गिल डावाला सुरुवात करू शकतात. तर कोहलीच्या जागी अय्यरला मैदानात उतरवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन
टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिंस (कर्णधार), एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरन ग्रीन, एडम जाम्पा, मार्कस स्टायनिस, मिचेल स्टार्क, स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर, जोश हेजलवूड, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट.