T20 World Cup 2024: 2 कीपर, 2 फिरकीपटू, 4 अष्टपैलू , टीम इंडियाची तगडी फौज, कुणाकडे कोणती जबाबदारी?
Cricket T20 World Cup: भारतीय संघातून केएल राहुलला डच्चू मिळाला आहे. तर शुभमन गिल याचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. स्फोटक फलंदाज रिंकू सिंह यालाही मुख्य संघात स्थान मिळू शकले नाही. हार्दिक पांड्याचे स्थान कायम.
मुंबई: वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरु असला तरी वर्ल्ड स्पर्धेसाठी ( T 20 World Cup) कोणत्या खेळाडुंना संधी मिळणार, याची उत्सुकता सर्व क्रीडाप्रेमींना लागली होती. अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) विश्वचषक स्पर्धेसाठीचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य संघातील 15 आणि तीन राखीव खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे टी 20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आयपीएल स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे सातत्याने टीकेचा धनी ठरत असलेल्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
तसेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जच्या शिवम दुबे याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. तर गुणवत्ता आणि कामगिरी या दोन्ही आघाड्यांवर सरस ठरुनही आतापर्यंत फारशी संधी न मिळालेल्या संजू सॅमसनलाही भारतीय संघाचे दरवाजे अखेर उघडे झाले आहेत. याशिवाय, एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान न मिळालेला फिरकीपटू युजवेंद्र चहल यालाही बऱ्याच काळानंतर टीम इंडियात स्थान मिळाले आहे. तर शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान यांचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर 9 जूनला कायम हायव्होल्टेज ठरणारा भारत विरुद्ध पाकिस्तानच्या संघाचा मुकाबला होणार आहे. 12 आणि 15 जूनला भारतीय संघाचा सामना अनुक्रमे अमेरिका आणि कॅनडाच्या संघाशी होईल.
यापूर्वी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करणार, याकडे भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
भारतीय संघ खालीलप्रमाणे
फलंदाज - 4
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,
अष्टपैलू - 4
हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल,शिवम दुबे,
विकेट कीपर - 2
ऋषभ पंत (विश्व के), संजू सॅमसन (डब्ल्यूके),
फिरकीपटू - 2
कुलदीप यादव, युजवेंद्र चहल ,
वेगवान गोलंदाज - 3
अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज.
आणखी वाचा
भारताचा नाही पण दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, कगिसो रबाडाला डच्चू, कुणाला संधी?