Ind vs Aus 1st ODI : टीम इंडिया पुन्हा एकदा कागदावरचा वाघ ठरली, ऑस्ट्रेलियासमोर टॉप-मिडल ऑर्डरचे सगळे फलंदाज फेल, रडतखडत इतक्या धावा केल्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (19 ऑक्टोबर) पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर रंगला.

Australia vs India, 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (19 ऑक्टोबर) पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर रंगला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अगदी योग्य ठरला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी 26 षटकांवर कमी करण्यात आला. मात्र, टीम इंडियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. टॉप आणि मिडल ऑर्डरमधील सर्वच प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. अखेर रडतखडत भारताने केवळ 136 धावांपर्यंत मजल मारली.
ऑस्ट्रेलियासमोर टॉप-मिडल ऑर्डरचे सगळे फलंदाज फेल
पर्थमध्ये टीम इंडियाचा टॉप ऑर्डर अक्षरशः फेल ठरला. तब्बल सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माला केवळ 8 धावा करता आल्या, तर विराट कोहलीनं 8 चेंडू खेळूनही खाते उघडता आलं नाही. शुभमन गिल फक्त 10 धावा करून माघारी फिरला. उपकर्णधार श्रेयस अय्यरलाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तो 11 धावांवर बाद झाला. परिणामी फक्त 45 धावांवर टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत जाऊन बसला.
अक्षर आणि राहुलची भागीदारी अन्....
तिसऱ्यांदा पावसामुळे सामना थांबल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. तेव्हा सामना 26-26 षटकांचा करण्यात आला. त्यावेळी भारताचा डाव अडचणीत होता. अशा वेळी अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनी संयमी फलंदाजी करत संघाला सावरलं. दोघांमध्ये 39 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. 20व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर बाद झाला, तोपर्यंत त्याने 38 चेंडूंमध्ये 31 धावा करत मोलाचं योगदान दिलं. केएल राहुललाही 25व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिचेल ओव्हनने बाद केलं, त्याने 31 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या. शेवटी नितीशने शेवटच्या षटकात काही चांगले फटके खेळले ज्यामुळे संघ सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यशस्वी झाला. पदार्पणाचा सामना खेळणारा नितीश रेड्डी 11 चेंडूत दोन षटकारांसह 19 धावा काढून नाबाद राहिला. भारताचा स्कोअर 136 पर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली.
स्टार्क आणि हेजलवूडचा कहर
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी कहर गोलंदाजी केली. स्टार्कने 6 षटकांत फक्त 22 धावा देत 1 बळी घेतला, त्याने विराट कोहलीला स्वस्तात बाद केलं. तर जोश हेजलवूडने 7 षटकांत केवळ 2 विकेट घेत भारताचा डाव कोसळवला. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर मिशेल स्टार्क आणि नाथन एलिस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
हे ही वाचा -





















