(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट, पाहा काय सांगतो हवामानाचा अंदाज
IND vs PAK, Asia Cup 2023 : पाकिस्तानच्या मुल्तानमध्ये आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीचा सामना सुरु आहे.
IND vs PAK, Asia Cup 2023 : पाकिस्तानच्या मुल्तानमध्ये आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीचा सामना सुरु आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघही श्रीलंकामध्ये दाखल झाला आहे. आशिया चषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात दोन सप्टेंबर रोजी होणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन सप्टेंबर, शनिवारी श्रीलंकेतील कँडी येथे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसभर जोरदार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज स्थानिक हवामान विभागाने वर्तवला आहे. पावासामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते.
कसे असणार हवामान?
शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. Accuweather च्या अंदाजानुसार, कँडीमध्ये दिवसभरात पावसाची शक्यता 70 टक्के इतकी आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता 20 टक्के आहे. हा सामना श्रीलंकेतील स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता आणि भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. हवामान अंदाजानुसार, सकाळच्या दरम्यान 55 टक्के पावसाचा अंदाज आहे, तर दुपारी 70 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. दिलासादायक म्हणजे, संध्याकाळी आकाश निरभ्र असेल आणि पावसाचा सामना खेळण्यात अडथळा येणार नाही. याशिवाय कॅंडीचे तापमान शनिवारी 28 अंश सेल्सिअस राहील.
भारतीय संघ श्रीलंकेत दाखल -
भारतीय संघही आशिया चषकासाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. बेंगेलोर येथीन एनसीएमध्ये टीम इंडियाच्या शिलेदारांनी आठवडाभर तयारी केली. त्यानंतर संपूर्ण संघ आज दुपारी श्रीलंकेसाठी रवाना झाला. केएल राहुल बेंगलोरमध्येच दुखापतीवर काम करणार आहे. आशिया चषकातील पहिले दोन सामने टीम इंडिया राहुलशिवाय खेळणार आहे. विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह संघातील सर्वच सहकारी श्रीलंकेत पोहचले आहे. तिलक वर्मा आणि रविंद्र जाडेजा यांनी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते.
आशिया चषकासाठी भारताचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर, दुखापतीमुळे दोन सामन्याला मुकणार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)
आणखी वाचा :
Asia Cup 2023 : विराट, रोहितसह टीम इंडिया श्रीलंकेत दाखल, केएल राहुल भारतातच!