Rishi Dhawan : अश्विननंतर 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्ती, सामन्यानंतर अचानक तडकाफडकी राजीनामा
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंच्या निवृत्तीच्या बातम्या सातत्याने येत आहेत, ज्याची सुरुवात रविचंद्रन अश्विनपासून झाली.
Rishi Dhawan Announces Retirement : सध्या भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंच्या निवृत्तीच्या बातम्या सातत्याने येत आहेत, ज्याची सुरुवात रविचंद्रन अश्विनपासून झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर आणि फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला वगळण्याचा आणि निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
मात्र या दोघांपूर्वी, गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या ऋषी धवननेही मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऋषीने 2016 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, याशिवाय त्याची गोलंदाजी आयपीएलमध्येही पाहायला मिळाली होती. ऋषी यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना निवृत्तीची माहिती दिली.
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचा कर्णधार आणि टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू ऋषी धवनने रविवार 5 जानेवारी रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये निवृत्तीची घोषणा केली. 34 वर्षीय धवनने आपल्या निवृत्ती पोस्टमध्ये सांगितले की, भारतीय क्रिकेटमधील मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. याचा अर्थ आता तो विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र, तो प्रथम श्रेणी म्हणजेच रणजी ट्रॉफीमध्ये खेळत राहील.
सामन्यानंतर अचानक तडकाफडकी राजीनामा
रविवारी 5 जानेवारी रोजी धवनच्या नेतृत्वाखालील हिमाचल प्रदेशने आंध्र प्रदेशचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयात धवनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पहिले 2 विकेट घेतले. त्यानंतर त्याने 45 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. धवनच्या नेतृत्वाखाली हिमाचलने 3 हंगामापूर्वी या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. पण आंध्र प्रदेश विरूद्ध सामन्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.
ऋषी धवनने आपल्या पोस्टमध्ये बीसीसीआय, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, त्यांचे सहकारी आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या फ्रँचायझींचेही आभार मानले. धवनचा शेवटचा आयपीएल संघ पंजाब किंग्स होता, पण यावेळी त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नाही.
View this post on Instagram
ऋषी धवनची कारकीर्द
टीम इंडियासोबत ऋषी धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार छोटी होती. त्याने टीम इंडियासाठी 2015 मध्ये वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, त्याने 3 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये तो फक्त 12 धावा करू शकला आणि त्याला फक्त 1 विकेट मिळाली. त्याच वर्षी, त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 1 धाव आणि 1 विकेट घेतली. धवनने आपल्या लिस्ट ए कारकिर्दीत 134 सामन्यांमध्ये 2906 धावा आणि 186 विकेट्स घेतल्या, तर 135 टी-20 सामन्यांमध्ये 1740 धावा केल्या आणि 118 विकेट्सही घेतल्या आहेत.