गुपचूप नाईट क्लबमध्ये गेला, 1 वर्षासाठी निलंबित झाला; भारताविरुद्ध 6 विकेट्स पटकावणारा जेफ्री वेंडरसे कोण?
IND VS SL Jeffrey Vandersay: श्रीलंकेचा फिरकीपटू जेफ्री वेंडरसे (Jeffrey Vandersay) याने 33 धावांत 6 विकेट्स घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले.
IND VS SL Jeffrey Vandersay: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना कोलंबोमध्ये खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला. या विजयासह चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. श्रीलंकेला 50 षटकांत 9 बाद 240 धावांवर रोखल्यानंतर भारताचा डाव 42.2 षटकांत 208 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार रोहित शर्माने 44 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह 64 धावांची आक्रमक खेळी केल्यानंतरही भारताला पराभूत व्हावे लागले. श्रीलंकेचा फिरकीपटू जेफ्री वेंडरसे (Jeffrey Vandersay) याने 33 धावांत 6 विकेट्स घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले.
कोण आहे जेफ्री वेंडरसे?
जेफ्री वेंडरसेने 2015 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. श्रीलंकेचा गोलंदाज जेफ्री वेंडरसे 34 वर्षांचा असून तो गाम्पाहा जिल्ह्यातील वट्टाला या उपनगरातील आहे. तो केवळ 37 सामने खेळला आहे. टीम इंडियाविरुद्धचा हा त्याचा दुसरा सामना होता. वेंडरसे फिरकीपटू असून त्याने 3 अर्धशतके झळकावताना जवळपास एक हजार धावा केल्या आहेत.
जेफ्री वेंडरसेला केलं होतं निलंबित-
जेफ्री वेंडरसेला 2018 मध्ये एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. त्याच्यावर कराराचा भंग केल्याचा आरोप होता. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कडक कारवाई केली होती. जेफ्री वेंडरसेला निलंबित करताना 20 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याच्यावर मॅचच्या एकदिवसाआधी रात्री गुपचूप हॉटेलमधून बाहेर पडून मित्रांसोबत नाईट क्लबमध्ये गेल्याचा आरोप होता. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जेफ्री वेंडरसेला एका वर्षासाठी निलंबित केलं होतं.
भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वेंडरसेला झाली होती दुखापत-
काल खेळला गेलेला सामना भारत विरुद्ध जेफ्री वेंडरसेचा दुसरा सामना होता. याआधी भारताविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. विराट कोहलीचा फटका थांबवताना तो चौकारासाठी त्याच्याच संघातील अन्य एका खेळाडूलाही भिडला. या धडकेमुळे तो गंभीर जखमी झाला होता.
टीम इंडिया 32 धावांनी पराभूत-
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी सादर केली. वॉशिंग्टन सुंदरने 10 षटकांत केवळ 30 धावांत 3 फलंदाज बाद केले. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने 50 षटकांत 9 गडी गमावून 240 धावा केल्या. अशाप्रकारे भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य होते, मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा डाव 42.2 षटकात 208 धावांवरच संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने झंझावाती अर्धशतक झळकावले, पण इतर फलंदाजांना साथ मिळाली नाही. परिणामी भारतीय संघाला 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
संबंधित बातमी:
IND vs SL: टीम इंडियाचा पराभव होताच गौतम गंभीरचा चेहरा पडला; रिॲक्शन सोशल मीडियावर व्हायरल