(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL, Gautam Gambhir: तो आला, त्यानं पाहिलं आणि सगळंच बदललं; श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या टीम इंडियावर गौतम गंभीरची छाप, पाहा 15 मुद्दे
IND vs SL, Gautam Gambhir : टीम इंडियात झालेल्या या सर्व बदलांवर एकंदरीत कुठेना कुठे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची छाप पाहायला मिळत आहे.
IND vs SL, Gautam Gambhir : नवी दिल्ली : टीम इंडियाच्या (Team India) ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या संघाला मिळालाय नवा कर्णधार. मुंबईच्या सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टीम इंडियाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका (Sri Lanka) दौऱ्यातल्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याला डावलून भारतीय संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यातल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी मुंबईचाच रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार असेल. पण ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे या दोन्ही फॉरमॅटसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. हार्दिक पंड्याचा भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात समावेश असला तरी त्याला वन डे सामन्यांसाठीच्या संघातून वगळण्यात आलं आहे.
टीम इंडियात झालेल्या या सर्व बदलांवर एकंदरीत कुठेना कुठे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची छाप पाहायला मिळत आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची कारकीर्द देखील याच मालिकेपासून सुरु होत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी 20 वर्ल्डकपनंतर संपला. बीसीसीआयनं गौतम गंभीर याच्यावर मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या टीम इंडियावर गौतम गंभीरची छाप
- हार्दिक पांड्याला डावलून टी20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आलं.
- हार्दिक पांड्याचे उपकर्णधारपद गेलंच. पण वनडे संघातही हार्दिक पांड्याला स्थान मिळालं नाही.
- शुभमन गिल याच्याकडे वनडे आणि टी20 संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलंय.
- रोहित शर्मा, विराट कोहली श्रीलंकाविरोधात वनडे मालिका खेळणार आहेत, रोहित शर्मा वनडे संघाची धुरा संभाळेल.
- ऋषभ पंत आणि केएल राहुल याचं वनडे संघात पुनरागमन झालंय. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात पंतनं शानदार कामगिरी केली होती.
- संजू सॅमसनला फक्त टी20 संघात स्थान मिळालं.
- जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा यांना आराम देण्यात आला.
- दीर्घ काळानंतर श्रेयस अय्यरचं भारतीय संघात कमबॅक झालं आहे. दुखापतीमुळे संघातील स्थान गमावलं, त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे अय्यरसोबत बीसीसीआयनं वार्षिक करार रद्द केला होता. अय्यरनं आठ महिन्यांपासून एकही वनडे सामना खेळला नाही.
- ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा यांना डच्चू देण्यात आला. झिम्बाब्वेविरोधात झालेल्या टी20 मालिकेत दोघांनीही शानदार कामगिरी केली होती. पण त्यांना श्रीलंकाविरोधात डावलण्यात आलं.
- नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात खराब कामगिरी करणाऱ्या रियान पराग आणि शिवम दुबे यांना वनडे आणि टी20 संघात स्थान देण्यात आलं आहे.
- झिम्बाब्वे दौऱ्यात मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर याच्यावर निवड समितीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला. श्रीलंकाविरोधात वनडे आणि टी20 संघात सुंदरला स्थान देण्यात आलेय. रवींद्र जाडेजाच्या रिप्लेसमेंटच्या रुपाने सुंदरकडे पाहिलं जात असल्याच्या चर्चा.
- युवा हर्षित राणा याला वनडे संघात स्थान देण्यात आलेय. आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळताना हर्षित राणाने प्रभावित केले होते.
- टी20 विश्वचषकात बेंचवर असणाऱ्या युजवेंद्र चहल याला पुन्हा डच्चू देण्यात आला. त्याशिवाय कुलदीप यादव यालाही टी20 संघातून वगळण्यात आले. कुलदीप यादव याला फक्त वनडे संघात स्थान देण्यात आलेय.
- 2023 टी20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघातील फक्त ईशान किशन टीम इंडियातून बाहेर आहे. जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आलाय, तर मोहम्मद शामी दुखापतग्रस्त आहे. इतर सर्व खेळाडूंचा निवड समितीने विचार केलाय.
- शुभमन गिल,ऋषभ पंत, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, शिवम दुबे, अर्शदीप सिंह आणि खलील अहमद हे आठ खेळाडू वनडे आणि टी20 संघात आहेत.