"3 फलंदाज, 2 गोलंदाज... पाकिस्तानचे पाच खेळाडू भारताची डोकेदुखी वाढवणार? "
World Cup 2023 : तीन फलंदाज आणि दोन गोलंदाज शनिवारी भारताची डोकेदुखी वाढवू शकतात, असे मत सुनंदन लेले यांनी व्यक्त केले आहे.
IND vs PAK, World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटले की क्रिकेट रसिकांसाठी मेजवानीच असते. खेळाडू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या तोंडचे पाणी पळवण्यासाठी उत्सुक असतात. सुनंदन लेले यांनी थेट अहमदाबादमधून (Narendra Modi Stadium) पाकिस्तानच्या संघाचे विश्लेषण केले आहे. पाकिस्तानचे पाच खेळाडू भारताची (IND vs PAK) डोकेदुखी वाढवू शकतात, असे त्यांनी सांगितलेय. लेले यांनी पाकिस्तानच्या कोणत्या पाच खेळाडूंबद्दल सांगितलेय ते पाहूयात....
अब्दुलाह शफीक, मोहम्मद रिझवान, कर्णधार बाबर आझम हे तीन फलंदाज भारताची डोकेदुखी वाढवू शकतात. अब्दुलाह शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी श्रीलंकेविरोधात शतकी खेळी करत भारताला इशाराच दिला होता. बाबर आझम याला कमी लेखण्याची चूक कुणीही करणार नाही. हे खेळाडू मोठ्या सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी करतात. भारताविरोधात टॉप कामगिरी करण्यास बाबर उत्सुक असेल. हे तीन फलंदाज भारताविरोधात चांगली कामगिरी करु शकतात. त्यांच्या कामिगिरीवर पाकिस्तानची कामगिरी अवलंबून आहे. हे तिन्ही फलंदाज चांगल्या गोलंदाजीविरोधात एकेरी दुहेरी धावसंख्या काढून धावा वाढवू शकतात. तर खराब चेंडूवर मोठे फटके मारण्याची क्षमताही त्यांच्याकडे आहेच.
गोलंदाजीचा विचार केल्यास शाहीन शाह आफ्रिदीचं मोठं प्रस्थ पाकिस्तानच्या संघात आहे. कारण, जो ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. बॉल बाहेर काढतो आणि टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो. हा चेंडू प्रत्येक फलंदाजासाठी डोकेदुखी वाढवणारा आहे. त्यामुळे शाहीन शाह आफ्रिदी आपली डोकेदुखी वाढवू शकतो. माझ्या मते शादाब खान भारताची डोकेदुखी वाढवू शकतो. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असेल तर शादाब खान यशस्वी ठरु शकतो. शादाब खान हवेत चेंडू फ्लाइट देत नाही. त्याचा चेंडू पटकन आतमध्ये येतो. त्याची गुगली आणि फ्लिपर हा त्याचा चेंडू महत्वाचा आहे.
अहमदाबादमध्ये वातावरण निर्मिती कशी आहे ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबाद येथे महामुकाबला होणार आहे. अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याची वातावरण निर्मिती आहे. पण अवास्तव अशी नाही, असे क्रिकेट एक्सपर्ट सुनंदन लेले यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा लेखाजोखा देण्यासाठी लेले दिल्लीवरुन अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. येथे पोहचल्यानंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत अहमदाबादमध्ये काय स्थिती आहे, याची माहिती दिली. अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याचे वातावरण आहे, पण अवास्तव नाही. शहारात कुठेही जाहीरातबाजीचे फलक नाहीत, असे लेले म्हटले.
अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याची जाहिरातबाजी दिसत नाही. नरेंद्र मोदी स्टेडिअमबाहेरही तितकी जाहिरातबाजी दिसत नाही. विराट कोहली, धोनी, रोहित शर्मा, शुभमन गिल यांच्या नावाचे टी शर्ट स्टेडिअमबाहेर विकले जात आहेत. मैदानाबाहेर सध्या तिकिट खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.