IND Vs PAK: विश्वचषकातील महामुकाबला आज, 'या' खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष
IND Vs PAK, T20 World Cup 2021: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यांत दोन्ही संघातील खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी महत्वाची ठरली आहे.
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाला शनिवारपासून युएईत सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तर, इंग्लंडने गतविजेत्या वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. परंतु, भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्याची सर्वांनाच उस्तुकता लागली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातस आज दुबईच्या आतंराराष्ट्रीय क्रिकेट स्डेडिअमवर सामना खेळला जाणार आहे. विश्वचषकात भारताने पाकिस्तान विरुद्ध एकही सामना गमावला नाही आणि विराट कोहलीकडूनही हीच अपेक्षा केली जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज खेळल्या जाणाऱ्या टी-20 सामन्यात दोन्ही संघातील महत्वांच्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यांत दोन्ही संघातील खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी महत्वाची ठरली आहे. आजच्या सामन्यातही दोन्ही संघातील अनेक खेळाडूंमध्ये एक अतिशय रंजक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या नजरा या खेळांडूवर असतील. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्वाच्या खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.
रोहित शर्मा विरुद्ध शाहीन अफ्रीदी
टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे यश सलामीवीर रोहित शर्माच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. रोहित शर्मा त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाला बॅकफूटवर ढकलू शकतो. परंतु, डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर रोहित शर्माला आपण संघर्ष करताना पाहिले आहे. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचा आत येणारा चेंडू रोहित शर्मासाठी अडचण ठरली आहे. पाकिस्तानकडे शाहीन आफ्रिदी हा जागतिक दर्जाचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या इन-स्विंग चेंडू रोहितला त्रासदायक ठरू शकतो. यामुळे आजच्या सामन्यात रोहित शर्मा विरुद्ध शाहीन आफ्रिदी असाही सामना पाहायला मिळू शकतो.
जसप्रीत बुमराह विरुद्ध फखर जमान
भारताचा वेगवान जसप्रीत बुमराह आणि फखर जमान यांच्यातील सामन्याचा इतिहास जुना आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहने 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फखर जमानला सुरुवातीलाच बाद केले. परंतु, नो बॉल असल्याने फखर खानला नाबाद घोषीत करण्यात आले होते. याचाच फायदा मिळवत फखरने भारताविरुद्ध शतक झळकावले होते. मागील एकदिवसीय विश्वचषकात फखर खानने बुमराहच्या गोलंदाजी सहज सामना केला होता. आजच्या सामन्यात बुमराहकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. बुमराहकडे फखरला स्वस्तात माघारी धाडण्याची संधी आहे.
विराट कोहली विरुद्ध शादाब खान
कर्णधार म्हणून आपला शेवटचा टी -20 विश्वचषक खेळणारा विराट कोहली आज पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून मोहिमेची सुरुवात करण्यास सज्ज आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली मैदानात संघर्ष करताना दिसला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वातावरण वेगळे आहे. आजच्या सामन्यात विराटचा सामना पाकिस्तानच्या शादाब खानसोबत पाहायला मिळू शकतो. कोहली हा जागतिक दर्जाचा खेळाडू असून त्याच्यात एकतर्फी विजय मिळवण्याची क्षमता आहे, हे विसरून चालणार नाही. यामुळे आजच्या सामन्यात विराट कोहली आणि शादाब खान यांच्यातही एक नवा सामना पाहायला मिळणार आहे.