(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अशक्तपणामुळे बेजार, डेंग्यूने हैराण, शुभमन गिल आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यालाही मुकणार? लेटेस्ट अपडेट
Shubman Gill Update : पाच वेळच्या जग्गजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय संघाने विश्वचषकाची विजयी सुरुवात केली.
Shubman Gill Update : पाच वेळच्या जग्गजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय संघाने विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. पण या सामन्यात शुभमन गिल टीम इंडियाच्या प्लेईंग 11 चा भाग नव्हता. शुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे तो आता दुसऱ्या सामन्यालाही मुकणार आहे. अफगाणिस्तानविरोधात दिल्लीमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी शुभमन गिल उपलब्ध नाही. 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या महामुकाबल्यालाही शुभमन गिल खेळण्याची शक्यता नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर होणार आहे. या सामन्यात शुभमन गिल खेळण्याची शक्यता कमीच आहे. शुभमन गिल याच्याबाबतचे हेल्थ अपडेट समोर आले आहे. त्यानुसार, शुभमन गिल भारतीय संघासोबत दिल्लीला गेला नाही. तो चेन्नईमध्येच उपचार घेईल, असे सांगण्यात आले आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यापर्यंत शुभमन गिल फिट होणार का?
पाकिस्तानविरोधातील सामन्यापर्यंत शुभमन गिल तंदुरुस्त होणार का? शुभमन गिल सध्या डेंग्यूचा सामना करत आहे. डेंग्यूच्या रुग्णाला पूर्णपणे ठीक होण्यासाठी पाच ते 10 दिवस लागू शकतात. त्यात त्या रुग्णाला अशक्तपणाही जाणवू शकतो. त्यात भारत आणि पाकिस्तान सामन्याला पाच दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शुभमन गिल याची टीम इंडियातील कमबॅक सोपं नसेल.
बीसीसीआयने काय म्हटले ?
शुभमन गिल याच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिल 9 ऑक्टोबर, 2023 रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही. आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे संघाचा पहिला सामना खेळू न शकलेला सलामीवीर 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणारा अफगाणिस्तानविरुद्ध पुढील सामना खेळू शकणार नाही. तो चेन्नईतच वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहणार आहे.”
ऑस्ट्रेलियाविरोधात टॉप ऑर्डर फ्लॉप ...
ऑस्ट्रेलियाविरोधात चेन्नई येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरले होते. शुभमन गिलच्या जागी सलामीला खेळणाऱ्या ईशान किशन याला खातेही उघडता आले नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील श्रेयस अय्यरलाही खाते उघडता आले नाही. दोन धावांत भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. कठीण परिस्थितीत विराट कोहलीने राहुलच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 85 तर राहुलने नाबाद 97 धावांची खेळी केली. गेल्या काही दिवसांपासून शुभमन गिल याने धावांचा रतीब घातला आहे, त्यामुळे त्याच्या फिटनेसकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.