विराट-रोहित अन् गिलही फ्लॉप, भारतीय संघ विश्वचषक कसा जिंकणार ?
India vs Pakistan Asia Cup 2023 : आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला.
India vs Pakistan Asia Cup 2023 : आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या डावादरम्यान पल्लेकेले येथे मुसळधार पाऊस आला, त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 266 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाची टॉप ऑर्डर पाकिस्तानच्या माऱ्यासमोर फेल गेल्याचे दिसले. आघाडीच्या चार फलंदाजांना लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी झुंजार फलंदाजी करत लाज राखली. पण टॉप ऑर्डर फेल जात असताना आपण विश्वचषक कसा जिंकणार? असा सवाल उपस्थित होतोय.
विश्व कप 2023 च्या आधी आशिया चषक होत आहे. यंदाचा आशिया चषक वनडे स्वरुपात होत आहे. टीम इंडिया आशिया चषकात संपूर्ण ताकदीने उतरली आहे. पण आघाडीच्या फलंदाजांना लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. रोहित शर्माने 22 चेंडूत फक्त 11 धावा केल्या. शुभमन गिल याने 32 चेंडूमध्ये 10 धावा केल्या. विराट कोहलीने 7 चेंडूत चार धावा केल्या. श्रेयस अय्यर याने टीम इंडियात कमबॅक केले. तो लयीतही दिसत होता. पण मोठी खेळी करु शकला नाही. अय्यरने 9 चेंडूमध्ये 14 धावा केल्या. रविंद्र जाडेजा यानेही 14 धावांचे योगदान दिले. शार्दूल तर पूर्णपणे फ्लॉप गेला. भारतीय संघाच्या दिग्गज फलंदाजांना धावा काढताना संघर्ष करावा लागला. भारतीय संघाची विश्वचषकाची तयारी पूर्ण झाली का? असा सवाल उपस्थित होतोय.
पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यात भारताचे दिग्गज फलंदाज फ्लॉप गेल्याने विश्वचषकाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर कोहली-रोहितसह फ्लॉप फलंदाजांना ट्रोलही केले. कोहली आणि रोहितबद्दल अनेक प्रकारचे मीम्स शेअर करण्यात आले.
पाकिस्तानची गोलंदाजी कशी राहिली -
शाहीन शाह आफ्रिदी याने 10 षटकात 35 धावा खर्च करत चार फलंदाजांना बाद केले. शाहीन आफ्रिदी याने कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा या स्टार फलंदाजांना तंबूत धाडले. नसीम शाह याने तळाची फलंदाजी बाद केली. नसीम शाह याने शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना बाद केले. हॅरिस रौफ याने शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना तंबूत पाठवले. हॅरिस रौफ याने 9 षटकात 58 धावा खर्च केल्या. तर नसीम शाह याने 8.5 षटकात 36 धावा दिल्या. शाहीन आफ्रिदी याने 10 षटकात दोन षटके निर्धाव फेकली. शादाब खान, मोहम्मद नवाज आणि आगा सलमान यांना एकही विकेट मिळाली नाही.
पाकिस्तानच्या तिकडीचा भेदक मारा, इशान-हार्दिकची झुंज -
पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. भारतीय संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजीही करु शकला नाही. शहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी भारताच्या दहा फलंदाजांना तंबूत धाडले. भारतीय संघाने 48.5 षटकात 266 धावांपर्यंत मजल मारली. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचलाय. इशान किशन याने 82 तर हार्दिक पांड्याने 87 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने 90 तर इशान किशन याने 81 चेंडूचा सामना केला. हार्दिक आणि इशान यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावसंख्या ओलांडता आली नाही. जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या केली.