(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 'हा' खेळाडू बाहेर जाण्याची शक्यता; अश्विनचे पुनरागमन निश्चित
India vs New Zealand: 2021 T20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात आर अश्विनचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे.
India vs New Zealand: 2021 T20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोघांनाही पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत जो संघ या सामन्यात पराभूत होईल त्याचा उपांत्यफेरी गाठण्याचा रस्ता आणखी कठीण होईल. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध वाईट पराभव झाला होता. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघात काही बदल करू शकतो.
वरुण चक्रवर्ती आराम मिळण्याची शक्यता
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने निराश केलं. त्याने चार षटकांत 33 धावा दिल्या. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. वरूणच्या जागी सीनिअर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन होऊ शकते. आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात आणि विश्वचषकाच्या सराव सामन्यांमध्ये अश्विनने दमदार कामगिरी केली होती.
ईशानलाही संधी मिळू शकते
आयपीएल 2021 च्या बाद फेरीत आणि विश्वचषकाच्या सराव सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणारा डावखुरा स्फोटक फलंदाज इशान किशनला न्यूझीलंडविरुद्धही संधी मिळू शकते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खांद्याच्या दुखापतीने त्रस्त झालेला दिसला होता. अशा परिस्थितीत त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध इशान किशनला संधी दिली जाऊ शकते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. यापूर्वी या मैदानावर टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे न्यूझीलंडलाही पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
न्यूझीलंडविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
स्पर्धेतील भारताचे वेळापत्रकृ
31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर: भारत वि स्कॉटलॅंड
नोव्हेंबर 8: नामिबिया वि भारत