(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi on Mohammed Shami: वेल प्लेड शामी! मोहम्मद शामीच्या गोलंदाजीची पंतप्रधान मोदींनाही भुरळ, ट्वीट करत म्हणाले...
PM Modi to Mohammed Shami: वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. मोहम्मद शामीनं या सामन्यात सात विकेट घेतल्या. पीएम मोदींनी शामीचं भरभरून कौतुक केलं आहे.
ICC World Cup Semi Final 2023, Mohammed Shami: टीम इंडियानं (Team India) सेमीफायनलमध्ये (ICC World Cup 2023) न्यूझीलंडचा (New Zealand) 70 धावांनी धुव्वा उडवत विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. या सामन्यात मोहम्मद शामीनं (Mohammed Shami) शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स चटकावल्या. फक्त देशच नाही अख्खं जग शामीच्या गोलंदाजीवर फिदा झालंय, अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही शामीच्या गोलंदाजीची भूरळ पडली आहे. शामीच्या गोलंदाजीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी भरभरून कौतूक केलं आहे.
टीम इंडियाच्या सेमीफायनलमधील धमाकेदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. की, "आजची सेमीफायन अधिक खास बनली ती शानदार वैयक्तिक कामगिरीमुळे, मोहम्मद शामीची तुफानी गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. वेल प्लेड शामी!'' पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताच्या विजयाचे अभिनंदन केलं आहे. दरम्यान, यंदाच्या विश्वचषकात शामीनं सहा सामन्यांत 23 विकेट्स चटकावल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
Today’s Semi Final has been even more special thanks to stellar individual performances too.
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023
The bowling by @MdShami11 in this game and also through the World Cup will be cherished by cricket lovers for generations to come.
Well played Shami!
मोहम्मद शामी टीम इंडियासाठी ठरला 'हुकुमी सत्ता'
न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करत 397 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर गडगडला. भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषक 2023 मधील हा सलग दहावा विजय. भारताकडून मोहम्मद शामीनं 9.5 षटकांत 57 धावांत 7 विकेट्स चटकावल्या. पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताच्या विजयाचे अभिनंदन केले.
शामीच्या वेगासमोर किवींची दांडी गुल्ल
दुसरीकडे, 398 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडचा संघ केवळ 327 धावाच करू शकला आणि सामना 70 धावांनी गमावला. किवी संघाकडून डॅरेल मिशेलनं 134 धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विल्यमसननं 69 आणि ग्लेन फिलिप्सनं 41 धावा केल्या. भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीनं सर्वाधिक 7 विकेट्स चटकावल्या. याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.
टीम इंडियाच्या नावे अनेक रेकॉर्ड्स
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल (80) यांनी 8.2 षटकात 71 धावा जोडून शानदार सुरुवात केली. गिलही चांगलाच फॉर्मात दिसला, पण तो 79 धावांवर रिटायर्डहर्ट झाला. अखेरच्या षटकांमध्ये गिल पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला असला तरी त्याला शतक झळकावता आलं नाही. या सामन्यात विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील 50 वं शतक झळकावलं. विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू बनला आणि सचिन तेंडुलकरचा (49 शतकं) विक्रम मोडला. श्रेयस अय्यरनंही झंझावाती शतक झळकावलं. या सर्व विक्रमांच्या जोरावर टीम इंडियानं विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं 26 मार्च 2015 रोजी सिडनी येथे टीम इंडिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये 328/7 (50) धावा केल्या होत्या.