IND vs ENG : अश्विन-जाडेजानं रोखलं, नंतर यशस्वी 'बॅझबॉल' खेळला, इंग्लंड फेल, पहिल्या दिवशी भारताचं वर्चस्व
IND vs ENG : इंग्लंडच्या बॅझबॉल या अतिआक्रमक प्रकार भारताच्या फिरकीपुढे फिका ठरला. भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे इंग्लंडचे विस्फोटक फलंदाज ढेर झाले.
IND vs ENG : इंग्लंडच्या बॅझबॉल या अतिआक्रमक प्रकार भारताच्या फिरकीपुढे (India vs England) फिका ठरला. भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे इंग्लंडचे विस्फोटक फलंदाज ढेर झाले. अश्विन(R Ashwin), रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल यांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव 246 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर यशस्वी जायस्वाल याच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने दिवसअखेर एक बाद 119 धावा केल्या आहे. हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व मिळवलं आहे. आज भारतीय संघ मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने मैदानात उतरले. इंग्लंडच्या बॅझबॉल क्रिकेटला टीम इंडियाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. खासकरुन यशस्वी जायस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने अतिआक्रमक फलंदाजी करत इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. चौकार आणि षटकारांची आतषबाजीकरत यशस्वीने भारताची धावसंख्या वेगानं वाढवली.
भारताच्या फिरकीपुढे इंग्लंडचं बॅझबॉल फेल -
हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात ‘बॅझबॉल’ या अति-आक्रमक प्रवृत्तीने खेळणारे इंग्लंडचे फलंदाज आणि भारतीय फिरकी याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागले होते. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकी वरचढ ठरली आहे. ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाचे प्रत्येकी तीन तीन बळी घेतले. तर अक्षर पटेल याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. त्यामुळे इंग्लंडचा डाव 246 धावांत संपुष्टात आला.
इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली, एकटा बेन स्टोक्स लढला -
भारताच्या फिरकी तिकडीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले असताना, इंग्लंडच्या आजी-माजी कर्णधारांनी काहीसा डाव सावरला. जो रुटने 60 चेंडूत 29 धावा केल्या. तर कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा काढल्या. जाडेजाने रुटला माघारी धाडत, इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मग ठराविक अंतराने जाडेजा, अश्विन, अक्षर पटेल आणि बुमराह विकेट घेत राहिले. पण एका बाजूने बेन स्टोक्स लढत राहिला. अखेर 64.3 षटकात बुमराहने बेन स्टोक्सची दांडी उडवून इंग्लंडची शेवटची विकेट मिळवली. स्टोक्सची रुपाने इंग्लंडला दहावा धक्का बसला! बेन स्टोक्स याने 88 चेंडूत 70 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता.
यशस्वी जायस्वालचं बॅझबॉल, इंग्लंडच्या फलंजाजांना धुतलं -
मुंबईकर यशस्वी जायस्वाल याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेत इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रतिउत्तर दिलं. डावखुऱ्या यशस्वी जायस्वाल याने 70 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेस आहे. गोलंदाजांनी आपले काम चोख बचावल्यानंतर यशस्वी जायस्वालच्या शानदार खेळीमुळे भारताने पहिल्या दिवसावर वर्चस्व मिळवलं आहे. यशस्वी जायस्वाल याला कर्णधार रोहित शर्माने चांगली साथ दिली. दोघांनी 12.2 षटकात 80 धावांची सलामी दिली. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माने आपली विकेट फेकली. रोहित बाद झाल्यानंतर य़शस्वी आणि गिल या युवांनी भारताची धावसंख्या 100 पार पोहचवली. यशस्वी जायस्वाल 76 आणि शुभमन गिल 14 धावांवर खेळत आहेत. आज भारतीय संघ आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. भारत सध्या 127 धावांनी पिछाडीवर आहे. भारताच्या हातात 9 विकेट शिल्लक आहेत. यशस्वी-गिल यांच्याशिवाय केएल राहुल, श्रेयस अय्यर, जाडेजा, भरत यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.