Eng vs Ind 5th Test 3th Day Stumps : तिसऱ्या दिवशी जैस्वाल-आकाशदीप-जडेजा-सुंदर चमकले, आता टीम इंडियाची मदार गोलंदाजांच्या हाती, जिंकण्यापासून 9 विकेट दूर
Eng vs Ind 5th Test 3th Day Stumps : भारत आणि इंग्लंड यांच्यात केनिंग्टन ओव्हलवर सुरु असलेली पाचवी कसोटी सध्या रोमांचक वळणावर पोहोचली आहे.

England vs India 5th Test 3th Day Stumps Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात केनिंग्टन ओव्हलवर सुरु असलेली पाचवी कसोटी सध्या रोमांचक वळणावर पोहोचली आहे. पावसाने व्यत्यय आणला नाही, तर सामना निर्णायक लागण्याची पूर्ण शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, भारताने इंग्लंडपुढे 374 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसअखेरपर्यंत 1 गडी गमावून 50 धावा केल्या आहेत. बेन डकेट 34 धावांवर नाबाद आहे, तर झॅक क्रॉली 14 धावांवर माघारी परतला. आता इंग्लंडला विजयासाठी अजून 324 धावांची गरज आहे आणि भारताला 9 गडी बाद करायचे आहेत. त्यामुळे आता भारताची मदार पूर्णपणे गोलंदाजांवर आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
Stumps on Day 3 at the Oval 🏟️
— BCCI (@BCCI) August 2, 2025
A fantastic day with the bat for #TeamIndia 🙌
England 50/1 in the 2nd innings
India need 9⃣ wickets to win the fifth and final Test!
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/fILzecV2jy
इंग्लंडची सावध सुरुवात, सिराजचा अचूक वार
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 13.5 षटकांचा खेळ झाला आहे. क्रॉलीचं विकेट पडताच पंचांनी दिवसाचा खेळ समाप्त असल्याचं जाहीर केलं. मोहम्मद सिराजने इंग्लंडला पहिला धक्का दिला. क्रॉली 36 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. दुसऱ्या बाजूने डकेट आक्रमक पद्धतीने खेळत होता. त्याने 48 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या.
तिसऱ्या दिवशी जैस्वाल-आकाशदीप-जडेजा-सुंदर चमकले
भारताची दुसरी डावात सुरुवात निराशाजनक होती. केएल राहुल फक्त 7 धावा, तर साई सुदर्शन 11 धावा करून बाद झाले. वाटत होतं की भारत मोठा स्कोअर उभारू शकणार नाही, पण यशस्वी जैस्वाल आणि नाईटवॉचमन आकाशदीप यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. आकाशदीपने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने 94 चेंडूत 12 चौकारांसह 66 धावा केल्या. तितक्याच आत्मविश्वासाने यशस्वी जैस्वालने आपलं दुसरं शतक साजरं केलं आणि 164 चेंडूत 14 चौकार व 2 षटकारांसह 118 धावांची दमदार खेळी केली. यानंतर शुभमन गिल (11) आणि करुण नायर (17) झटपट बाद झाले.
सुंदरचा शेवटी 'सिक्स शो', इंग्लंडचे गोलंदाज हतबल
भारताची अवस्था 229 धावांवर 5 बाद अशी झाली. पण मग रवींद्र जडेजाने जबाबदारी घेतली आणि 77 चेंडूत 5 चौकारांसह 53 धावा केल्या. ध्रुव जुरेलनेही 46 चेंडूत 4 चौकारांसह 34 धावांचं योगदान दिलं. 357 धावांवर भारताचे 9 गडी बाद झाले होते, तेव्हा वाशिंग्टन सुंदरने अंतिम घाव घातला. त्याने केवळ 46 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारून 53 धावा ठोकल्या. मोहम्मद सिराज शून्यावर बाद झाला, तर प्रसिद्ध कृष्णा नाबाद राहिला.
इंग्लंडकडून जोश टंगने 5 विकेट घेतल्या. गस अकटिन्सनने 3 बळी टिपले, तर जेमी ओव्हर्टनने 2 विकेट घेतल्या. महत्त्वाचं म्हणजे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्स दुखापतीमुळे या सामन्यात अपयशी ठरला. तो पहिल्या डावात फलंदाजीला उतरू शकला नाही आणि दुसऱ्या डावात गोलंदाजीही करू शकला नाही.
आता सगळ्या नजरा भारतीय गोलंदाजांवर
374 धावांचं मोठं लक्ष्य समोर असताना, इंग्लंडला अजून 324 धावांची गरज आहे. भारताला सामना जिंकायचा असेल, तर त्यांना उर्वरित 9 विकेट पटकन घ्याव्या लागतील. चौथा दिवस निर्णायक ठरणार, आणि सध्याच्या घडीला सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकलेलं दिसतंय, पण अंतिम निकाल अजून बाकी आहे.





















