(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Aus: रोहित शर्माची माघार?, टीम इंडियामध्ये खळबळ; कर्णधारपद कोण सांभाळणार, महत्वाची माहिती आली समोर
India vs Australia: बॉर्डर- गावसकर ट्रॉफीच्या आधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे.
Rohit Sharma Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) पहिल्या दोन कसोटी सामन्यात रोहित शर्मा मुकण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कारणामुळे दोन सामन्यांमधून रोहित शर्मा माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित शर्माने याबाबत बीसीसीआयला कळवल्याचेही सांगण्यात येत आहे. मालिका सुरू होण्याआधी वैयक्तिक बाब निकाली निघाल्यास रोहित शर्मा सर्व सामने खेळू शकेल, असंही बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे.
रोहित शर्माची जागा कोण घेणार?
रोहित शर्मा पहिल्या 2 सामन्यांमधून बाहेर पडला तर त्याच्या जागी दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये भारत ब संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन घेऊ शकतो. ईश्वरन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. ईश्वरनने दुलीप ट्रॉफीमध्ये 2 शतकी खेळी खेळली आणि नुकत्याच झालेल्या इराणी चषक 2024 च्या सामन्यातही त्याने 191 धावांची शतकी खेळी खेळली होती.
कर्णधारपद कोणाकडे?
कर्णधारपदाचा विचार केल्यास, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराह भारतीय संघाची धुरा सांभाळू शकतो. याआधी देखील जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.
रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार?
रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं बोललं जात आहे. पत्नी रितिका सजदेह प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रोहितची पत्नी रितिका हिने डिसेंबर 2018 मध्ये एका मुलीला जन्म दिला. रोहितच्या मुलीचे नाव समायरा आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा पुढीलप्रमाणे -
पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 06-10 डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी, सिडनी
कोण मारणार बाजी?
बऱ्याच काळानंतर बॉर्डर-गावसकर मालिकेत 2024-25 मध्ये 5 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेअंतर्गत शेवटच्या वेळी 1991-92 मध्ये 5 कसोटी सामने खेळले गेले होते. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल.
नॅथन लायनही विजयासाठी उत्सुक-
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनही भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप उत्सुक आहे. लायन म्हणाला की, 10 वर्षांपासून हे काम अपूर्ण आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने शेवटची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2014-15 मध्ये जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने चारही मालिका जिंकल्या आहेत.