(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिला वनडे सामना आज; स्टेडियमध्ये होणार प्रेक्षकांची एन्ट्री
IND vs AUS : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. याच सामन्यापासून लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सामना पाहण्यासाठी प्रेक्षक उपस्थित असणार आहेत.
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेमधील पहिला सामना आज सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने मागील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला वनडे सीरिजमध्ये 2-1ने पराभूत केलं होतं. दरम्यान, त्यावेळी खेळण्यासाठी बंदी घातल्यामुळे स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात सहभागी नव्हते. हे दोन्ही खेळाडू परत आल्यामुळे यजमान संघाचं पारडं जड झालं आहे.
दुसरीकडे भारतीय संघाला आपला 'हिटमॅन' रोहित शर्माची कमतरता जाणवणार आहे. दुखापतीमुळे रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या गैरहजेरीत फलंदाजांच्या क्रमवारीवर नक्कीच परिणाम होणार आहे. या मालिकेपासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांची एन्ट्री होणार आहे. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून उपलब्ध जागांच्या केवळ 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, तिकीट विक्री करण्यात आली आहे.
8 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळणार भारतीय संघ
भारतीय संघ लॉकडाऊनपूर्वी आंतरराष्ट्रीय सामना मार्च महिन्याच्या सुरुवातीला न्यूझिलंड विरोधात खेळला होता. कोरोना महामारीमुळे बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या भारतीय संघाचा सामना आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंशी होणार आहे. अशातच यजमान संघाला पराभूत करणं भारतीय संघासाठी फारसं सोपं असणार नाही. तसेच भारतीय संघ आपल्या जुन्या अंदाजात म्हणजेच, 1992च्या विश्वचषकाच्या नेव्ही ब्ल्यू जर्सीमध्ये दिसून येणार आहे.
भारतीय फलंदाजांचा सामना यजमान संघाच्या सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाजांशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडे एडम जाम्पाच्या रुपात एक कुशल स्पिनर आहे. ज्याने अनेकदा विराट कोहलीच्या नाकी नऊ आणले आहेत. त्याशिवाय स्टीव्ह स्मिथ, रन मशीन डेविड वार्नर आणि नवखा मार्नस लाबुशेन यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताविरोधात सर्वोत्कृष्ट खेळी करण्यासाठी कंबर कसली आहे.
पाहा व्हिडीओ : भारत-ऑस्ट्रेलिया वन डे, टी-20 सामन्यांना उत्तम प्रतिसाद, सामन्यांची 50% तिकीटं संपली
केएल राहुलसाठी अग्निपरिक्षा
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी दोघांचाही समावेश होऊ शकतो. किंवा संघ व्यवस्थापक कसोटी सामन्यांची मालिका समोर ठेवत एकदिवसीय मालिकेत एका सामन्यात एकालाच संधी देऊ शकते. अशातच शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांना संधी देण्यात येऊ शकते. केएल राहुलसाठी हा दौरा एखाद्या अग्निपरिक्षेप्रमाणेच असणार आहे. उपकर्णधार केएल राहुलने आयपीएलमध्ये शानदार खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही आपली कामगिरी उत्तम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु, केएल राहुलची खरी कसोटी विकेटकिपर म्हणून असणार आहे. कारण त्याला विकेटच्या मागे धोनीची जागा घ्यावी लागणार आहे. स्वतः राहुलने मान्य केलं आहे की, धोनीची जागा घेणं कोणालाही शक्य नाही.
हार्दिक पंड्या सहाव्या किंवा सातव्या नंबरवर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी माहिर आहे. त्यामुळे कोहली दोन स्पिनर घेऊन मैदानावर उतरु शकतो. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरने मागील दौऱ्यावर उत्तम खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांसाठी चहल चिंतेचा विषय ठरु शकतो. तर भुवनेश्वर कुमारसारखा डेथ ओव्हरचा विशेषज्ञ असलेला गोलंदाजाच्या गैरहजेरीत बुमराह संघाची धुरा सांभाळू शकतो.
भारताचा संभाव्य संघ :
शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी.
ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ :
आरोन फिंच (कर्णधार), डेविड वार्नर, स्टीव स्मिथ, मार्कस लाबुशेन, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एडम जंपा, मिशेल स्टॉर्क, पैट कमिंस आणि जोश हेजलवुड.
महत्त्वाच्या बातम्या :