(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND Vs AUS 4th Test | ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला, दिवस अखेरीस 5 बाद 274 धावा
ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला. मार्नस लाबुशेनने दमदार शतकाच्या जोरावर पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलियाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 274 धावा केल्या आहेत.
IND Vs AUS Brisbane Test Day 1 Highlights | बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला. पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलियाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 274 धावा केल्या आहेत. सध्या कॅमरुन ग्रीन 28 धावा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन 38 धावा करुन नाबाद आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता सुरु होईल.
मार्नस लाबुशेनने दमदार शतक केलं. त्याने 204 चेंडूत 108 धावांची खेळी केली. तर मॅथ्यू वेड 87 चेंडूत 45 धावा आणि स्टीव्ह स्मिथने 77 चेंडूत 36 धावा केल्या. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताच्या टी नटराजनने दोन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ऑस्ट्रेलियाने अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला माघारी पाठवलं. त्याला केवळ एकच धाव करता आली. तर विल पुकोवस्कीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या हॅरिस पाच धावांवर बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचली. स्टीव्ह स्मिथ 36 धावा करुन वॉशिंग्टनचा शिकार बनला. त्यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशेनला टी नटराजनने अखेरच्या सत्रात बाद केलं.
भारताच्या अडचणी वाढल्या दुखापतींचं ग्रहण लागलेल्या भारतीय संघाला अखेरच्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात चार बदलांसह मैदानात उतरावं लागलं. या कसोटीत भारतीय संघ जसप्रीत बुमरा आणि आर अश्विनशिवायच मैदानात उतरला आहे. त्यातच नवदीप सैनीला दुसऱ्या सत्रात दुखापत झाली आणि त्याला तपासणीसाठी पाठवण्यात आलं.
निर्णायक कसोटीत कोणाचा विजय? दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया एक-एक असे बरोबरीत आहेत. अॅडलेडमधील पहिला कसोटी सामना भारताने गमावला. त्यानंतर मेनबर्न कसोटीत भारताने जबदस्त कमबॅक केलं. सिडनीमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे आता चौथ्या आणि अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीचा जो निकालावरुनच बॉर्डर-गावस्कर मालिका कोण जिंकणार याचा फैसला होणार आहे.