IND vs AUS: अखेरच्या वनडेत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल, गिलसह हे स्टार्स बाहेर!
India's Predicted Playing XI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा वनडे सामना राजकोटमध्ये 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.
India's Predicted Playing XI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा वनडे सामना राजकोटमध्ये 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवून तीन सामन्याची मालिका २-० ने जिंकली आहे. दोन्ही सामन्यात भारताने प्रभावी कामगिरी केली. आता तिसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या प्लेईंग ११ मध्ये बदल निश्चित मानला जातोय. भारताचा सलामीवीर शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर होऊ शकतात.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या रिपोर्ट्सनुसार, संघ व्यवस्थापनाने शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. गिल आणि शार्दुल तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी राजकोटला संघासोबत जाणार नाहीत, तर दोघे गुवाहाटीमध्ये संघात सामील होतील, असे अहवालात म्हटले आहे. विश्वचषकाआधी भारताचा सराव सामना इंग्लंडविरोधात गुवाहाटीमध्ये होणार आहे. विश्वचषकातील भारताचा पहिला साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरोधात चेन्नईमध्ये आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
कोणते होणार बदल -
अखेरच्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांचे कमबॅक होतेय. तिसऱ्या वनडेत जसप्रीत बुमराहचेही कमबॅक होणार आहे. शार्दुलच्या जागी बुमराहला खेळवण्यात येईल. याशिवाय नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघात पुनरागमन करतील. अशा स्थितीत संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतात. कर्णधार रोहित शर्मा गिलची जागा घेईल. गिलच्या जागी कर्णधार सलामीला येणार हे निश्चित आहे. ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला येऊ शकतात.
तिसऱ्या वनडेतील संभाव्य प्लेईंग ११ -
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
दुसऱ्या वनडेत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 99 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार ऑस्ट्रेलियाला ३१७ धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले होते. पण अश्विन-जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 217 धावांत आटोपला. डेविड वॉर्नर आणि सीन एबॉट यांनी अर्धशतके ठोकली. इतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अश्विन-जाडेजा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. या विजयासह तीन सामन्याची मालिका भारताने २-० ने जिंकली आहे. मोहाली आणि इंदौर वनडे सामन्यात भारताने बाजी मारली. अखेरचा सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव संघात परतणार आहेत.