IND Vs AUS 2nd Test | भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं 70 धावांचं आव्हान
IND Vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांत आटोपला असून भारतासमोर विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य आहे.
मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आलं आहे. त्यामुळे ही कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर 70 धावांचं आव्हान आहे. ही कसोटी जिंकून भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला पॅट कमिन्स आणि कॅमरुन ग्रीन या जोडीला भारतीय गोलांदाजांना काहीसं जेरीस आणलं. पण त्यानंतर जसप्रीत बुमराने ही जोडी फोडली. पॅट कमिन्स 22 धावा करुन माघारी परतला. दोघांनी सातव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या कॅमरुन ग्रीनला मोहम्मद सिराजने माघारी धाडलं. त्याने 45 धावा केल्या. नॅथन लियॉन तीन धावांवर तर जोस हेजलवूड 10 धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 200 धावांवर आटोपला
भारताकडून मोहम्मद सिराजने तीन, जसप्रीत बुमरा, आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन तर उमेश यादवने एक विकेट घेतली.
दरम्यान या कसोटी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कसोटीच्या पहिल्या दिवसापासूनच भारताचं वर्चस्व राहिलं. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांन ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं जसप्रीत बुमराने चार, आर अश्विनने तीन, मोहम्मद सिराजने दोन आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 195 धावांमध्ये गुंडाळलं.
यानंतर भारतीय फलंदाजांनी आपल्या पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी केली. रहाणे शतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 326 धावा करत ऑस्ट्रेलियावर 131 धावांची आघाडी मिळवली.
ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. तिसऱ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज माघारी परतले होते. मग पॅट कमिन्स आणि कॅमरुन ग्रीन यांच्या 57 धावांच्या भागीदारी रचली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला काहीशी झुंज दिल्यानंतर पॅट कमिन्स आणि कॅमरुन ग्रीन माघारी परतले आणि ऑस्ट्रेलियाला 200 धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आलं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे 69 धावांची आघाडी असल्यामुळे भारताला विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य मिळालं.
संबंधित बातम्या
IND Vs AUS 2nd Test | बॉक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवसही भारताने गाजवला, ऑस्ट्रेलिया 6/133
INDvsAUS : कर्णधार अजिंक्य रहाणेचे शानदार शतक, टीम इंडिया सुस्थितीत