IND Vs AUS 2nd Test | बॉक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवसही भारताने गाजवला, ऑस्ट्रेलिया 6/133
भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. फलंदाजीत सरस कामगिरी करणाऱ्या भारताने गोलंदाजीतही कमाल केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी धाडण्यात भारताला यश आलं.ऑस्ट्रेलियाकडे सध्या दोन धावांची आघाडी असून चार विकेट्स हातात आहेत. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात सामना संपवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
मेलबर्न : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. पण टीम इंडिया अतिशय मजबूत स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सहा बाद 133 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे सध्या दोन धावांची आघाडी असून चार विकेट्स हातात आहेत.
दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे 112 धावांवर बाद झाला. त्यानंतर 57 धावा करुन रवींद्र जडेजाही माघारी परतला. मग भारताचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला. परिणामी टीम इंडियाने 131 धावांची आघाडी घेतली.
यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची घसरगुंडी पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे दाणादाण उडवत सहा विकेट्सही मिळवल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डावाने पराभूत होण्यापासून वाचवलं. तिसरा दिवस संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सहा बाद 133 धावा केल्या होत्या. कॅमरुन ग्रीन 17 धावा आणि पॅट कमिन्स 15 धावा करुन नाबाद आहेत.
आता तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच सामना संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. दुसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. तर अर्धशतकी खेळ करणाऱ्या रवींद्र जडेजाने गोलंदाजीतही कमाल दाखवली. त्याने दोन विकेट्स घेतल्या.
पहिला सामन्यातील लाजिरवाणा पराभव आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फेव्हरेट समजलं जात होतं. होतं. परंतु टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केलं आहे. ज्या पीचवर टीम इंडियाने 300 पेक्षा धावा केल्या, त्यावर ऑस्ट्रेलिया एका फलंदाजाला अर्धशतकही करता आलेलं नाही.