भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, कांगारुंना नमवत मालिकाही घातली खिशात
IND Vs AUS, Match Highlights : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 99 धावांनी विजय मिळवला.
IND Vs AUS, Match Highlights : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 99 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार ऑस्ट्रेलियाला ३१७ धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले होते. पण अश्विन-जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 217 धावांत आटोपला. डेविड वॉर्नर आणि सीन एबॉट यांनी अर्धशतके ठोकली. इतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अश्विन-जाडेजा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. या विजयासह तीन सामन्याची मालिका भारताने २-० ने जिंकली आहे. मोहाली आणि इंदौर वनडे सामन्यात भारताने बाजी मारली. अखेरचा सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव संघात परतणार आहेत.
भारताने दिलेल्या ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. मॅथ्यू शॉर्ट आणि स्मिथ स्वस्तात तंबूत परतले. शॉर्ट ९ धावांवर बाद झाला तर स्मिथला खातेही उघडता आले नाही. लाबुशेन आणि वॉर्नर यांनी डाव सावरला. पण तोपर्यंत पावसाने हजेरी लावली. दीड ते दोन तास पावसाने वाया गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाला सुधारित आव्हान देण्यात आले. डकवर्थ लुईस नियमांनुसार, ऑस्ट्रेलियाला ३१ षटकात ३१७ धावांचे आव्हान देण्यात आले होते.
पावसानंतर खेळाला सुरुवात झाल्यानंतर डेविड वॉर्नर आणि लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ही जोडी अश्विनने फोडली. अश्विनने वॉर्नर आणि लाबुशेन यांना तंबूत धाडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. डेविड वॉर्नर याने ५३ धावांची खेळी केली. तर लाबुशेन याने २७ धावा जोडल्या. अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिश, कॅमरुन ग्रीन यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस सीन एबॉट याने वादळी फलंदाजी करत पराभवाचे अंतर कमी केले. एबॉट याने ५४ धावांची खेळी केली. त्याला हेजलवूड याने २३ धावा करुन चांगली साथ दिली.
भारताकडून रविचंद्र अश्विन आणि जाडेजा यांनी भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा याने दोन विकेट घेतल्या. मोहम्मद शामी याने एक विकेट घेतली.
That's that from the 2nd ODI.
— BCCI (@BCCI) September 24, 2023
Jadeja cleans up Sean Abbott as Australia are all out for 217 runs in in 28.2 overs.#TeamIndia take an unassailable lead of 2-0.#INDvAUS pic.twitter.com/LawVWu2JI8