(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC T-20 World Cup 2024: पहिले नाव टाळलं, त्याने आयपीएलमध्ये मैदान गाजवलं; आता ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या संघात घेतलं
ICC T-20 World Cup 2024: आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत विश्वचषक पटकावलं होतं.
ICC T-20 World Cup 2024: आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup)ची स्पर्धा 2 जूनपासून सुरु होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.
आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत विश्वचषक पटकावलं होतं. टी-20 विश्वचषकमध्ये देखील ऑस्ट्रेलियाचा संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. टी-20 विश्वचषकासाठी संघाची धुरा मिचेल मार्शकडे सोपवण्यात आली आहे. याचदरम्यान आयपीएलमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या जेक फ्रेझर मॅकगर्कला राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील केले आहे.
जेक फ्रेझर मॅकगर्क आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. दिल्लीसाठी जेक फ्रेझर मॅकगर्कने आक्रमक फलंदाजी करत काही सामने जिंकून दिले. परंतु दिल्लीचा संघ प्ले ऑफ फेरीत पोहचू शकले नाही. मॅकगर्कने 9 सामन्यात 234.04 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 330 धावा केल्या. तसेच आयपीएलच्या या हंगामात मॅकगर्कने 15 चेंडूत अर्धशतकही झळकावले.
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अर्गर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.
राखीव खेळाडू- जेक फ्रेझर मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट
जेक फ्रेझर मॅकगर्क कोण आहे? (Who is Jake Fraser-McGurk?)
जेक फ्रेझर हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे, ज्याचा जन्म 11 एप्रिल 2002 रोजी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे झाला. मॅकगर्कने कॅरी बॅप्टिस्ट ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तो त्याच्या आक्रमक आणि तुफानी खेळीसाठी ओळखला जातो. मॅकगर्कने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 16 सामने खेळताना 550 धावा केल्या आहेत. त्याच्या लिस्ट-1 कारकिर्दीत त्याने 21 सामन्यांत 525 धावा केल्या आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या या तुफानी फलंदाजाने 41 टी-20 सामने खेळून 808 धावा केल्या आहेत. त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी पदार्पण केले, जिथे तो वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना दिसला. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून खेळलेल्या 2 वनडे सामन्यांमध्ये त्याने 221.73 च्या स्ट्राईक रेटने 51 धावा केल्या आहेत.
दिल्लीने 20 लाखात खरेदी केलं-
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीच, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतीमुळे मोसमातून बाहेर होता. एनगिडीच्या जागी दिल्लीने जेक फ्रेझर मॅकगर्कला आपल्या संघात सामील केले होते. दिल्लीने त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच 20 लाखात मॅकगर्कचा समावेश केला आहे. मॅकगर्क अगदी कमी पैशात दिल्ली कॅपिटल्ससाठी कोट्यावधींची कामे करत आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
जेतेपद पटकावणार संघ होणार मालामाल-
टी-20 विश्वचषक पटकावणारा संघ मालामाल होणार आहे. टी-20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम 5.6 दशलक्ष डॉलर्स आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहिली तर ती अंदाजे 46.77 कोटी रुपये येते. त्याचबरोबर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 13.36 कोटी रुपये आहे. तर उपविजेत्याला 6.68 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे.