ICC Men's ODI Player Rankings: वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठा बदल; ख्रिस वॉक्स कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंगमध्ये
टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या दहामध्ये केएल राहुल आणि विराट कोहली हे दोनच भारतीय फलंदाज आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये एकाही भारतीय गोलंदाजा समावेश नाही.
ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (ICC) एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळाडूंची नवीन रँकिंग जाहीर केली आहे. आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाचवे स्थान कायम राखले तर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
विराट कोहलीच्या नावे 762 गुण असून तो इंग्लंडचा डेव्हिड मालन (888 गुण), ऑस्ट्रेलियाचा व्हाईट बॉल कॅप्टन अॅरोन फिंच (830 गुण), पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (828 गुण) आणि न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉन्वे (774 गुण) यांच्या मागे आहे.
राहुल 743 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल एका स्थानाने झेप घेत सातव्या स्थानावर पोहचला आहे. टॉप 10 मध्ये राहुल आणि कोहली हे दोनच भारतीय फलंदाज आहेत. त्याचबरोबर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या पहिल्या 10 यादीमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.
त्याचबरोबर आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा पहिल्या पाचमध्ये कायम आहेत. हे दोघेही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या पाठोपाठ अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर आहेत. एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 865 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. अव्वल दहा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराही सहाव्या स्थानावर घसरला आहे तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा नवव्या स्थानी आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्स श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या आयसीसी पुरुष विश्वचषक सुपर लीग मालिकेतील शानदार कामगिरीच्या बळावर करिअरच्या सर्वोत्कृष्ट तिसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या इतर वेगवान गोलंदाज डेव्हिड विली आणि टॉम कर्रन यांनाही ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे. विलीने 13 स्थानांची झेप घेत 37 व्या स्थानावर आणि कर्रनने 20 स्थानांची झेप घेत 68 वे स्थान मिळवले आहे.
एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट 737 गुणांसह पहिल्या, बांग्लादेशचा मेहदी हसन 713 गुणांसह दुसऱ्या आणि ख्रिस वॉक्स 711 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.