T20 World Cup 2024: 2024 च्या टी-20 विश्वचषकाचं यजमानपद अमेरिकेला मिळण्याची शक्यता
T20 World Cup 2024: इतर देशांमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्याच्या उद्देशानं आयसीसी मोठ्या स्पर्धांचं यजमानपद नवीन देशांकडे सोपवण्याचा विचार करीत आहे.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 बाबत महत्वाची माहिती समोर आलीय. दरम्यान, 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचं यजमानपद अमेरिकेला मिळण्याची शक्यता दर्शवली जात आहे. आयसीसी संयुक्तपणे या विश्वचषकाचं यजमानपद यूएसए क्रिकेट आणि क्रिकेट वेस्ट इंडिजकडं सोपवू शकते. अमेरिकेत 2028 मध्ये होणारे ऑलिम्पिक स्पर्धा हे त्याचं मुख्य कारण मानलं जातंय. अमेरिकेच्या लॉस ऐन्जलीस शहरात 2028 मध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा पार पडणार आहे. अमेरिकेत 2024 चा विश्वचषक आयोजित केल्यास 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत टी-20 क्रिकेटचा समावेश करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी आयसीसीला आशा आहे.
इतर देशांमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्याच्या उद्देशानं आयसीसी मोठ्या स्पर्धांचं यजमानपद नवीन देशांकडे सोपवण्याचा विचार करीत आहे. टी-20 विश्वचषक 2024 मध्ये 20 नवीन संघ सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेत 55 सामने खेळले जातील. टी-20 विश्वचषक 2021 च्या स्पर्धेत 16 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी 12 संघांनी ग्रुप स्टेजमध्ये प्रवेश केला होता. "ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला बीसीसीआयनं पूर्ण पाठिंबा दर्शवलाय. या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला तर, भारतीय संघ त्यामध्ये नक्की सहभागी होईल. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये एकमत आहे." असं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटलं होतं.
टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियामध्ये होणार-
टी-20 क्रिकेटचा आठवा विश्वचषक 16 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला देण्याची ही पहिलीच वेळ असेल. या विश्वचषकात 16 संघ सहभागी होणार असून एकूण 45 सामने खेळले जाणार आहेत. भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंड या देशांनी या विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली आहे. तर, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना हा विश्वचषक खेळण्यासाठी पात्रता फेरीतून जावे लागणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-