एकदिवसीय विश्वचषकातून भारताची छप्परफाड कमाई; आजवरचे विक्रम मोडले, किती रुपये कमावले?
ICC Cricket World Cup 2023: ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताचे विजयी अभियान रोखताना विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावला होता.
ICC Cricket World Cup 2023 Revenue India Economy: भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2024 च्या स्पर्धेमुळे भारताला 1.39 अब्ज डॉलर म्हणजेच 11,637 कोटी रुपये फायदा झाला. आयसीसीने याबाबत अधिकृत माहिती दिली. तसेच या आर्थिक प्रभावाचा सर्वाधिक फायदा पर्यटन क्षेत्राला झाला, असंही अहवालाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
भारतात आयोजित करण्यात आलेली विश्वचषक स्पर्धा ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (ICC Cricket World Cup 2023) ठरली आहे. या स्पर्धात टीम इंडियाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताचे विजयी अभियान रोखताना विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावला होता.
12 लाख 50 हजार लोक विश्वचषक पाहण्यासाठी भारतात-
विश्वचषकाचे सामने ज्या शहरांमध्ये खेळले गेले त्या शहरांमध्ये पर्यटन उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली गेली. विश्वचषकादरम्यान निवास, खाद्यपदार्थ, प्रवास आणि वाहतूक यासह पर्यटनाने सुमारे 7,231 कोटी रुपये कमावले. यावेळी एकूण 1.25 दशलक्ष म्हणजेच 12 लाख 50 हजार लोकांनी मैदानात उपस्थित राहत विश्वचषकाचा सामना पाहिला, हाही एक विक्रम होता. परदेशी प्रवाशांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही फायदा झाला आहे. परदेशी प्रवाशांची निवास व्यवस्था, विविध शहरांचा प्रवास आणि इतर गोष्टींद्वारे 2,360 कोटी रुपये कमावले आहेत. 68 टक्के परदेशी प्रवाशांनी असेही सांगितले की ते त्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना भारतात भेट देण्यास नक्कीच सांगतील. बहुतेक परदेशी प्रवासी पाच दिवस भारतात राहिले.
🚨 2023 WORLD CUP ADDED 11,637CR INR TO THE INDIAN ECONOMY. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 11, 2024
- This is insane amount! 🤯🇮🇳 pic.twitter.com/S0e6r1CVxY
75 टक्के लोक प्रथमच आयसीसीचा 50 षटकांचा सामना पाहण्यासाठी आले-
आयसीसीच्या या अहवालात दावा करण्यात आला आहे की, विक्रमी 12 लाख 50 हजार प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये एकदिवसीय विश्वचषक पाहिला आणि यापैकी सुमारे 75 टक्के लोक प्रथमच आयसीसीचा 50 षटकांचा सामना पाहण्यासाठी आले होते. अहवालात असे म्हटले आहे की, स्पर्धा आयोजित केल्यामुळे प्रत्यक्ष भागीदारीबरोबरच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील इतर संस्थांद्वारे 48 हजारांहून अधिक पूर्ण आणि अर्धवेळ नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
19 टक्के पर्यटक पहिल्यांदाच भारतात-
आयसीसीच्या अहवालानुसार, मुलाखत घेतलेल्या आंतरराष्ट्रीय चाहत्यांपैकी 55 टक्के लोकांनी यापूर्वी नियमितपणे भारताला भेट दिली होती, तर 19 टक्के आंतरराष्ट्रीय चाहत्यांनी विश्वचषकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारताला भेट दिली. आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी आपल्या प्रवासादरम्यान अनेक पर्यटन स्थळांचा दौरा केला. ज्यामध्ये 28 कोटी 12 लाख डॉलरचा आर्थिक परिणाम झाला. जवळपास 68 टक्के लोकांनी सांगितले की, ते भविष्यात त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना भारत भेटीची शिफारस करतील, ज्यामुळे भारताची जागतिक प्रतिमा आणखी सुधारेल.
संबंधित बातमी:
आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधीच 'मास्टरस्ट्रोक'; जय शाह यांनी घेतला मोठा निर्णय