Team India : भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला यावं, PCB कडून प्रयत्न सुरु, भारतीय चाहत्यांना मोठी ऑफर
ICC Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारतानं अद्याप पाकिस्तानला जाण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केलेला नाही.
PCB Offer To Indians Fans For Champions Trophy 2025 नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये केलं जाणार आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआयनं अद्याप पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला नाही. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल पद्धतीनं आयोजित करण्यासंदर्भात पर्याय सूचवला आहे. श्रीलंका किंवा दुबईमध्ये भारताचे सामने आयोजित करावेत असा पर्याय सूचवण्यात आला आहे. मात्र, पीसीबीकडून भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानमध्ये सामने खेळावेत यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. पीसीबीकडून बीसीसीआयनं पाकिस्तानमध्ये खेळण्यासंदर्भात निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पीसीबीनं ऑफर जाहीर केली आहे.
पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी म्हटलं की, भारतीय चाहत्यांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विशेष कोटा ठेवला जाईल. याशिवाय भारतीय चाहत्यांच्या व्हिसाची प्रक्रिया देखील वेगवान केली जाईल. काही मिडिया रिपोर्टस नुसार मोहसीन नक्वी यांनी एका वृत्तपत्राच्या हवाल्यानं म्हटलं की, आम्ही भारतीय चाहत्यांसाठी तिकिटांचा विशेष कोटा निश्चित करणार आहोत. त्यांना व्हिसा जारी करण्यासाठी प्रक्रिया वेगवान करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फेब्रुवारी- मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र, अजूनही आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारत सरकारनं टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करेल की नाही याबाबत निर्णय घेतलेला नाही. भारत सरकारनं पाकिस्तान दौऱ्याबाबत निर्णय घेतल्यानंतरच आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
आशिया कप वेळी भारताचे सामने श्रीलंकेत
आशिया कप 2023 चं आयोजन देखील पाकिस्तानकडे होते. त्यावेळ भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानमध्ये सामने खेळले नव्हते. भारताचे सामने त्यावेळी श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. आशिया कपची सेमी फायनल आणि फायनल श्रीलंकेत झाली होती.
दरम्यान, भारतानं पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दिला आणि पाकिस्तान त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यास मोठा पेच निर्माण होऊ शकतो. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास श्रीलंकेला स्पर्धेत खेळण्याची संधी मिळू शकते. भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिल्या आठ स्थानावर असलेल्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रवेश मिळाला आहे.
इतर बातम्या :