टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न गेल्यास पाकिस्तानाला फायदा होणार; महत्वाची माहिती आली समोर
ICC Champions Trophy 2025: टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास त्याचा फायदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डला होणार आहे.
ICC Champions Trophy 2025: पाकिस्तानला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद मिळाले आहे. मात्र, स्पर्धेचे सामने पाकिस्तानात होणार की नाही, हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामागचे कारण म्हणजे बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तयार नाही. त्यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास त्याचा फायदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डला होणार आहे.
रिपोर्टनुसार, जर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळण्यास पाकिस्तानला गेली नाही तर आयसीसी यजमान असल्यामुळे पीसीबीला अतिरिक्त पैसे देईल. वास्तविक, ज्या प्रकारची समीकरणे तयार होत आहेत, ते पाहता 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाईल, अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपले सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पीसीबीला अतिरिक्त निधी दिला जाईल.
टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास पाकिस्तानात येण्यास भाग पाडण्याची जबाबदारी आयसीसीवर सोपवली आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक अंतिम आणि जाहीर करण्याची जबाबदारी आता आयसीसीवर असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान म्हणून पीसीबीने सर्व औपचारिकता पूर्ण केल्याचे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे. पीसीबीने पाठवलेल्या प्रस्तावित वेळापत्रकाला देखील आयसीसीने हिरवा झेंडा दाखवला आहे आणि या स्पर्धेसाठी 1,280 कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटलाही मंजुरी दिली आहे. पाकिस्तानने तयार केलेल्या वेळापत्रकानूसार टीम इंडियाला आपले सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळायचे आहेत.
टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार-
बीसीसीआयने अनेकवेळा आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत भारताचे सामने दुबई किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खेळवले जातील.
आशिया चषकासाठी बीसीसीआयने दिला होता नकार-
गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे.