हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुनही हटवणार?; तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा
Hardik Pandya Team India: आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले होते.
Hardik Pandya Team India: भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यात 27 जुलैपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या रुपात नवा कर्णधार मिळाला आहे.
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधार म्हणून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या पांड्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मागच्या वर्षी रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली होती. पुढील सत्राआधी आयपीएलचा लिलाव होणार असल्याने रोहित मुंबई संघात कायम राहणार का, हेदेखील पाहावे लागेल.
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले होते. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले. मात्र नुकताच टीम इंडियाचा टी-20 चा कर्णधार झालेला सूर्यकुमार यादवही मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तसेच आयपीएलचा लिलावही जवळ येत आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला मोठी रक्कम खर्च करावी लागेल. तसेच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह असल्याचं सांगण्यात येत आहे. हार्दिक पांड्याकडून मुंबईने कर्णधारपद काढून घेतल्यास त्याला हा तिहेरी धक्का असणार आहे.
हार्दिककडून कर्णधारपद जाणार?
एक संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकतो हे बीसीसीआयने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र अहवालानुसार, एक संघ 4 खेळाडूंना कायम ठेवू शकतो, त्यापैकी 3 भारतीय आणि एक विदेशी खेळाडू असेल. मुंबई इंडियन्सकडे सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवण्याचा पर्याय असेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्या कायम राहणार की त्याचं कर्णधारपद हिसकावून घेणार, हे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल.
भारतीय संघात हार्दिक पांड्याची जागा निश्चित?
हार्दिक पांड्याला कर्णधारपद मिळालेले नाही, त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील स्थानावर प्रश्न उपस्थित होणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पांड्या चांगली कामगिरी करू शकला नाही तर काय होईल? गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल दिसणार आहे. पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार असून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार्दिकने सहभाग न घेतल्याने त्याच्या भवितव्याबाबतही चिंता निर्माण होत आहे.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?