Gautam Gambhir Team India Head Coach: जय शहा यांचं एक वाक्य अन् गौतम गंभीर टीम इंडियाचं प्रशिक्षकपद सांभाळण्यास तयार...; दोघांमध्ये काय चर्चा झाली?
Gautam Gambhir Team India Head Coach: गौतम गंभीर याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्यानं यशस्वी काम केले आहे.
Gautam Gambhir Team India Head Coach: भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी तयार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि गौतम गंभीर यांच्यात याबाबत दीर्घकाळ चर्चा झाली.
गौतम गंभीर याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्यानं यशस्वी काम केले आहे. आयपीएल 2024 विजेत्या कोलकाता संघाचा गौतम गंभीर मेंटॉर होता. बीसीसीआयने गौतम गंभीर यालाही अर्ज करण्याचा आग्रह केला होता. राहुल द्रविडने कार्यकाळ वाढवण्यास नकार दिल्यानंतर बीसीसीआयकडून नव्या कोचचा शोध सुरु झाला होता. त्यासाठी अर्जही मागवण्यात आले होते.
BCCI & Gambhir share the same belief that "We must do it for the country" - the talks between Jay Shah & Gambhir to be centred on this idea. [Cricbuzz] pic.twitter.com/cDN5P3CUqR
— Johns. (@CricCrazyJohns) May 28, 2024
जय शहा आणि गौतम गंभीरमध्ये काय चर्चा झाली?
रिपोर्टनूसार, कोलकाता आणि हैदराबादच्या अंतिम सामन्यानंतर गौतम गंभीर आणि जय शहा यांची भेट झाली. यावेळी जय शहा यांनी सांगितले की, 'आता देशासाठी काम करायचे आहे'. गौतम गंभीर त्याच्या देशभक्तीसाठी ओळखला जातो. याबाबत गंभीरने अनेक प्रसंगी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. यामुळेच त्याने जय शहा यांची विनंती गंभीरने मान्य केली आणि राहुल द्रविडच्या जागी मुख्य प्रशिक्षक सांभाळण्यासाठी तो तयार झाला.
नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ किती?
टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होईल, जो 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द -
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 वनडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये 4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.