India vs Pakistan : विश्वचषकात पाकिस्तान भारताचा पराभव करेल, शोएब अख्तरचं भाकित
India vs Pakistan World Cup Match : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय.
Shoaib Akhtar On India vs Pakistan World Cup Match : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय. विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रीडा चाहत्यांना उत्सुकता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे. या ब्लॉकबास्टर सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील माजी खेळाडूंनी आपापली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारताचा पराभव करेल, असा विश्वास शोएब अख्तर याने व्यक्त केलाय.
विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारताने बाजी मारलेली आहे. वनडे विश्वचषकात पाकिस्तानला आतापर्यंत भारताचा पराभव करता आलेला नाही. मोठ्या सामन्यात दबाव झेलण्याची पाकिस्तानच्या संघाचे मजबूत बाजू असल्याचे शोएबने म्हटलेय. शोएब अख्तर याने रेव स्पोर्ट्स संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. प्रत्येकवेळा पहिल्यांदा काही ना काही होतेच. भारतीय संघावर वारंवार जिंकण्याचा दबाव आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताचा पराभव करण्याची पाकिस्तानकडे मोटी संधी असेल, असे शोएब अख्तर म्हणाला.
आशिया चषकात दिसेल ट्रेलर
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. त्यापूर्वी श्रीलंकामध्ये याची रंगीत तालिम पाहायला मिळणार आहे. आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीलंका येथील पल्लेकेले स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. आशिया चषक यंदा एकदिवसीय स्वरुपात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोन सामने होतील. पाकिस्तानने आशिया चषकासाठी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची निवड अद्याप झालेली नाही. भारतीय संघाची निवड 20 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.
विश्वचषक कधीपासून -
भारतात होणारा विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत.
आणखी वाचा :