(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs NZ : जो रुटची चिवट फलंदाजी, इंग्लंडची 282 धावांपर्यंत मजल
ENG vs NZ Innings Report: विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 282 धावांपर्यंत मजल मारली आहे.
ENG vs NZ Innings Report: विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 282 धावांपर्यंत मजल मारली आहे. इग्लंडकडून जो रुट याने चिवट फलंदाजी करत 77 धावांचे योगदान दिले. तर न्यूझीलंडकडून मॅट हेनरी याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 282 धावांचे आव्हान आहे.
अहमदाबादमध्ये विश्वचषकाच्या थराराला सुरुवात झाली. गतविजेता इंग्लंड आणि उप विजेता न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा थरार सुरु आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केल्यामुळे हा निर्णय चुकला की काय असेच वाटत होते. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ठरावीक अंताराने विकेट घेत इंग्लंडला रोखले.
इंग्लंडकडून जो रुट याने चिवट फलंदाजी केली. एका बाजूला विकेट पडत असताना जो रुट याने दुसऱ्या बाजूला एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर दिला. जो रुट याने 77 धावांची दमदार खेळी केली. जो रुट याने 86 चेंडूत एक षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 77 धावांचे योगदान दिले. कर्णधार जोस बटलर आणि सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो यांना चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. जॉनी बेअरस्टो याने 35 चेंडूत 33 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये बेअरस्टो याने एक षटकार आणि चार चौकार ठोकले. तर कर्णधार जोस बटलर याने 42 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.
जो रुट, जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्याही ओलांडता आली नाही. डेविड मलान 14, हॅरी ब्रूक 25, मोईन अली 11 आणि लियाम लिव्हिंगस्टोन 20 धावांवर तंबूत परतले. सॅम करन आणि ख्रिस वोक्स या अष्टपैलू खेळाडूंनाही मोठी खेळी करता आली नाही. सॅम करन याने 14 तर ख्रिस वोक्स याने 11 धावांचे योगदान दिले.
इंग्लंड संघाच्या फलंदाजांना मोठी भागिदारी करता आली नाही. न्यूझीलंडच्या माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगन घातले. जोस बटलर 188 धावांवर बाद झाला. त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी ढेपाळली. लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांना मोठी खेळी करता आली नाही. त्याशिवाय मोईल अली आणि हॅरी ब्रूक हे भरवशाचे फलंदाजही अपयशी ठरले. त्यामुळे इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
न्यूझीलंडकडून मॅट हेनरी याने अचूक टप्प्यावर मारा केला हेनरी याने 10 षटकात 48 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत धाडले. त्याशिवाय ट्रेंट बोल्ट यानेही 48 धावा खर्च करत एक विकेट घेतली. मिचेल सँटनर याची फिरकीपुढेही इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले. मिचेल सँटनर याने 10 षटकात 37 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. ग्लेन फिलिप्स याने 3 षटकात 17 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्य. रविंद्र याने एका फलंदाला तंबूत धाडले.