आधी जॉर्डनने हॅट्ट्रिक घेतली, नंतर बटलरने एकाच षटकात 5 षटकार ठोकले, इंग्लंडचा 10 विकेटनं विजय
ENG vs USA : इंग्लंडने अमेरिकेचा 10 विकेटने दारुण पराभव केला. इंग्लंडने 62 चेंडू आणि 10 विकेट राखून सहज विजय मिळवला. जोस बटलरने एकाच षटकात 5 षटकार ठोकले. ख्रिस जॉर्डनने हॅटट्रिक घेत अमेरिकेला रोखले.
ENG vs USA : अमेरिकेचा दहा विकेट आणि 62 चेंडू राखून दारुण पराभव करत जोस बटलरच्या इंग्लंडने टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकिट निश्चित केलेय. जोस बटलरने एकाच षटकात 5 षटकार ठोकले. ख्रिस जॉर्डनने हॅटट्रिक घेत अमेरिकेला रोखले. हे इंग्लंडच्या डावाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 60 धावा केल्या होत्या.
इंग्लंडने 62 चेंडू आणि 10 गडी राखून अमेरिकेचा पराभव केला. जोस बटलर आणि फिलिप सॉल्टची सलामीची भागीदारी अमेरिकेच्या गोलंदाजांना तोडता आली नाही. इंग्लंडचा कर्णधार बटलरने 38 चेंडूत 83 धावांची वादळी खेळी करत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर फिलिप सॉल्टने 21 चेंडूत 25 धावांचं योगदान दिले. धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 60 धावा केल्या होत्या. अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना माफक 115 धावांपर्यंतच मजल मारली. यजमान अमेरिकासाठी नितीश कुमारने सर्वाधिक धावा केल्या. नितीशने 24 चेंडूत 30 धावांची खेळी केली.
अमेरिकाकडून फक्त 116 धावांचे माफक आव्हान
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून यजमान अमेरिकेला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले होते. इंग्लंडच्या माऱ्यापुढे अमेरिकेची फलंदाजी ढेपाळली, चांगल्या सुरुवातीनंतर अमेरिकनं लागोपाठ विकेट फेकल्या. अखेरच्या चार विकेट तर एकही धाव न करता गमावल्या. अमेरिकेचा संघ फक्त 115 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
अमेरिकेच्या तब्बल अर्ध्या संघाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शेवटच्या 4 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. अमेरिकेकडून नितीश कुमारने 30 धावांचे योगदान दिले तर कोरी अँडरसनने 29 धावांची खेळी केली. अमेरिकेच्या फलंदाजाला एकही मोठी भागिदारी करता आली नाही, ठरावीक अंतराने त्यांनी विकेट फेकल्या. कर्णधार ॲरॉन जोन्सने 10 धावा आणि हरमीत सिंगनेही 21 धावांचे योगदान दिले.
बटलरचे तुफान -
116 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलर आणि फिलिप सॉल्ट यांनी आक्रमक फलंदाजी केली. गतविजेत्या इंग्लंडने तिसऱ्या षटकापासून अतिशय वेगाने धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने 60 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. बटलरने या सामन्यात 38 चेंडूत 83 धावा केल्या. जोस बटलरने हरमीत सिंहच्या एकाच षटकात 5 षटकार ठोकले. हरमीतच्या त्या षटकात एकूण 32 धावा कुटल्या. 10व्या षटकात बटलरने विजयी चौकार लगावला.
इंग्लंडचा उपांत्य फेरीत प्रवेश
अमेरिकाचा पराभव करत इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला. टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड पहिला संघ बनला. सुपर 8 मध्ये ब गटात इंग्लंडचा संघ अव्वल आहे, त्यांनी तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यापैकी एक संघ आता ब गटातून उपांत्य फेरती पोहचणार आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सोमवारी होणारा सामना निर्णायक असेल. यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळू शकते.
ख्रिस जॉर्डनची हॅट्ट्रिक
टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने या विश्वचषकात दोनदा हॅट्ट्रिक घेतली होती. ख्रिस जॉर्डनने आज हॅट्ट्रिक घेतली. त्याने आधी अली खान, नंतर केंझिगे आणि शेवटी सौरभ नेत्रावलकर याला तंबूत पाठवत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने कोरी अँडरसनची विकेटही घेतली. जॉर्डनने 2.5 षटकात केवळ 10 धावा देत 4 बळी घेतले.