Shane Warne Award : फिरकीच्या जादूगाराचा अनोखा सन्मान, ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील महान पुरस्कार आता 'शेन वॉर्न टेस्ट प्लेयर ऑफ द इयर'
Shane Warne : ऑस्ट्रेलियाचे महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे 4 मार्च, 2022 रोजी आकस्मित निधन झाले होते. ज्यानंतर आता ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून एका खासप्रकारे त्यांचा सन्मान केला गेला आहे.
Shane Warne Award News : अवघ्या क्रिकेट विश्वाला ज्यांच्या फिरकी गोलंदाजीनं अक्षरश: वेड लावलं होत त्या शेन वॉर्न (Shane Warne) यांच्या आकस्मित निधनानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्न यांचा एक मोठा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता शेन वॉर्न यांच्या नावाने एक प्रतिष्ठित कसोटी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा 'शेन वॉर्न टेस्ट प्लेयर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया क्रिकेटने घेतला आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. वॉर्नने त्यांच्या कारकिर्दीत एकदा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हा प्रतिष्ठीत पुरस्कार पटकावला आहे. 2005 च्या ऍशेसमध्ये इंग्लंडविरुद्ध 40 विकेट घेतल्यानंतर वॉर्न यांना 2006 मध्ये सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता. ज्यानंतर आता त्यांच्या नावाने हा महान पुरस्कार दिला जाणार आहे. जागतिक क्रिकेटमधील महान क्रिकेटर म्हणून प्रसिद्ध शेन वॉर्न यांनी 4 मार्च, 2022 रोजी जगाचा निरोप घेतला. दक्षिण थायलंडमधील सामुई बेटावर त्यांचे निधन झाले. मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी ते थायलंड गेले असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनानंतर संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली होती.
शेन वॉर्न यांची कारकीर्द
जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्न यांची ख्याती होती. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्न यांनी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवल्या आहेत. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे.
शेन वॉर्नची नेत्रदिपक कामगिरी
- कसोटी क्रिकेटमध्ये शेन वॉर्नच्या नावावर एकूण 708 विकेट्सची नोंद आहे.
- मुथय्या मुरलीधरननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 विकेट्सचा टप्पा गाठणार जगातील दुसरा गोलंदाज.
- एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 194 सामन्यात 293 विकेट्सची नोंद
- सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं त्याच्या कारकिर्दीत तब्बल 37 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
- एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम, शेन वॉर्ननं 2005 मध्ये 96 कसोटी विकेट्स घेतल्या होत्या.
- शेन वॉर्ननं त्याच्या कसोटी कारकिर्दीत 13 अर्धशतकं झळकावली आहेत.
हे देखील वाचा-