(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Champions Trophy 2025 : पीसीबीची पुन्हा नाचक्की; टीम इंडिया नाही जाणार पाकिस्तानात, 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. अनेक वर्षांनी पाकिस्तान कोणत्या तरी आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे.
Champions Trophy 2025 Hybrid Model India Play In Dubai : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. अनेक वर्षांनी पाकिस्तान कोणत्या तरी आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. मात्र, या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. आयसीसीने सर्व सामन्यांचे ठिकाण निवडले आहे, परंतु आता या स्पर्धेच्या ठिकाणाबाबत एक अपडेट समोर आले आहे. ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पुन्हा नाचक्की होऊ शकते.
पाकिस्तानमध्ये नाही 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल?
गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नाहीत, त्यामुळे भारतीय संघ या देशाचा दौरा करत नाही. यामुळे, दोन्ही संघांमध्ये कोणतीही मालिका खेळली जात नाही, फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कप दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये सामने खेळले जातात. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाऊ शकते. या स्पर्धेचा अंतिम सामना लाहोर येथे होणार आहे. पण जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर फायनल मॅचही पाकिस्तानबाहेर होईल, हा सामना दुबईत होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत, असे मानले जात आहे की टीम इंडिया आपले सर्व ग्रुप स्टेजचे सामने पाकिस्तानबाहेर खेळेल आणि उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतरही मैदानात बदल केले जातील. सध्या दोन्ही उपांत्य फेरीचे सामने पाकिस्तानमध्येच खेळले जाणार आहेत. दुबई, अबुधाबी आणि शारजाह सारख्या मैदानांवर भारताचे गट टप्पा, उपांत्य आणि अंतिम सामने होऊ शकतात. आशिया कप 2023 देखील अशाच संकरित मॉडेलमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये सर्व देशांचे सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आले होते, तर टीम इंडियाने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले आणि अंतिम सामनाही येथेच झाला. म्हणजे तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा आजमावता येईल.
तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे पुनरागमन होत आहे. त्याच वेळी 29 वर्षांनंतर पाकिस्तानी भूमीवर आयसीसीचीही पहिली स्पर्धा आहे. ड्राफ्ट वेळापत्रकानुसार टीम इंडियाला आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळायचे आहेत. टीम इंडिया 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर ती 23 फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. त्याच वेळी, भारत 1 मार्च रोजी स्पर्धेचे यजमान आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध गट टप्प्यातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळेल. पण जर टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर गेली नाही तर या सर्व सामन्यांच्या ठिकाणी बदल दिसू शकतात.
पाकिस्तान गतविजेता, भारत घेणार बदला
चॅम्पियन्स ट्रॉफीची शेवटची आवृत्ती 2017 मध्ये खेळली गेली होती. ज्यात पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत पाकिस्तान आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्याचा प्रयत्न करेल, तर भारत पाकिस्तानचा बदला घेईल.