Ben Stokes Retirement : मोठी बातमी! इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
Ben Stokes : इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार असणाऱ्या बेन स्टोक्सने अचानकपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला असून सोशल मीडियावर स्वत: त्याने ही माहिती दिली आहे.
Ben Stokes Retirement : क्रिकेट जगतातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली असून इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा (Ben Stokes Retirement) निर्णय नुकताच जाहीर केला आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन एक भावूक पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे. स्टोक्स त्याचा अखेरचा सामना उद्या अर्थात 19 जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहम येथे खेळणार असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील हा पहिला एकदिवसीय सामना आहे. बेनने एक अत्यंत भावूक पोस्ट लिहित निवृत्ती जाहीर केली असून यावेळी त्याने इंग्लंडचा एकदिवसीय संघाचा सध्याचा कर्णधार जोस बटलरसह संपूर्ण इंग्लंड क्रिकेटचे आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
❤️🏴 pic.twitter.com/xTS5oNfN2j
— Ben Stokes (@benstokes38) July 18, 2022
काय म्हणाला स्टोक्स?
'मी इंग्लंडसाठी अखेरचा एकदिवसीय सामना मंगळवारी डरहममध्ये खेळणार असून त्यानंतर ही या प्रकारातून निवृत्ती घेणार आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. मी इंग्लंडसाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळलेला प्रत्येक मिनिट मला खूप जवळ आहे. हा एक सुंदर प्रवास होता. पण हा निर्णय घेण्यापेक्षा अवघड मी माझा 100 टक्के सहभाग माझ्या संघाला देऊ शकत नाही हे आहे.
मागील 11 वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळत असून आता तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणं माझ्यासाठी अवघड होत असून माझं शरीरही या संपूर्ण वेळापत्रकासाठी खास साथ देत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे माझ्याजागी कर्णधार जोस आणि संघाला एक चांगला खेळाडू मिळू शकतो. तसंच या निर्णयानंतर मी कसोटी आणि टी20 क्रिकेटसाठी जास्त चांगल्याप्रकारे संघाला सहकार्य करु शकेन.
मी जोस बटलर, मॅथ्यू पोट यांच्यासह सर्व संघाला शुभेच्छा देतो. मागील 7 वर्षात आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली असून भविष्य अधिक उज्ज्वल दिसत आहे. मी 104 एकदिवसीय सामने खेळले असून होमग्राऊंड डरहममध्ये अखेरचा सामना खेळण्यासाठी आनंदी आहे. मला माहित आहे इंग्लंडचे चाहते माझ्यासाठी कायम असून मी देखील त्यांच्या कायम सोबत आहे. मला आशा आहे माझा अखेरचा एकदिवसीय सामना मी संघाला जिंकवून देऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाला आघाडी मिळवून देईन.' विशेष म्हणजे या पोस्टसोबत बेनने विश्वचषक पकडलेला स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे.
बेन स्टोक्स एक उत्तम अष्टपैलू
स्टोक्स हा इंग्लंड क्रिकेटमधील एक सर्वात महान अष्टपैलू क्रिकेटर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या स्टोक्सने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या या कारकिर्दीवर एक थोडक्यात नजक फिरवूया...
फलंदाजी
क्रिकेट |
सामने | डाव | धावा | सर्वोच्च धावसंख्या | अॅव्हरेज | स्ट्राईक रेट | 100s | 50s | 4s | 6s | झेल |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | 83 | 152 | 5280 | 258 | 36.16 | 58.09 | 11 | 28 | 638 | 100 | 89 |
एकदिवसीय | 104 | 89 | 2919 | 102* | 39.44 | 95.26 | 3 | 21 | 238 | 88 | 49 |
टी-20 | 34 | 28 | 442 | 47* | 20.09 | 136.84 | 0 | 0 | 34 | 20 | 15 |
गोलंदाजी
क्रिकेट | सामने | डाव | चेंडू | धावा | विकेट्स | बेस्ट | अॅव्हरेज | इकोनॉमी | 4w | 5w | 10w |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | 83 | 133 | 10721 | 5894 | 182 | 6/22 | 32.38 | 3.29 | 8 | 4 | 0 |
एकदिवसीय | 104 | 87 | 3080 | 3093 | 74 | 5/61 | 41.79 | 6.02 | 1 | 1 | 0 |
टी-20 | 34 | 28 | 490 | 717 | 19 | 3/26 | 37.73 | 8.77 | 0 | 0 | 0 |