Ranji Trophy | 'रणजी करंडक'ला कोरोनाचा फटका; 87 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा रद्द
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी सामन्यांचे (Ranji Trophy) आयोजन करण्यात येणार नाही. रणजी करंडकात खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना मानधन देण्याचा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला आहे.
मुंबई: कोरोनाचा फटका यंदाच्या रणजी करंडकाला बसला आहे. भारतीय क्रिकेटच्या 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धा होणार नाहीत. तसं बीसीसीआयने सलग्न संघटनांना पत्राद्वारे कळवलं आहे. त्या बदल्यात विजय हजारे चषकाचं आयोजन करण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा म्हणून रणजी करंडक स्पर्धा ओळखली जाते. पण यंदाच्या रणजी करंडकाचे सामने रद्द करुन बीसीसीआयने पुरुष, महिला गटातील विजय हजारे राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा एकदिवसीय सामन्यांची आहे.
आशियाई क्रिकेट काऊंसिलच्या अध्यक्षपदी BCCI सचिव जय शाह
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून रणजी करंडक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्याबाबत सर्व संलग्न संघटनांना पत्र लिहलंय. त्या पत्रात सांगितलं आहे की रणजी सामने रद्द करुन त्या बदल्यात विजय हजारे स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. सोबत महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे. विजय हजारे चषकानंतर विनू मंकड अंडर 19 स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.
रणजी करंडकाचे आयोजन रद्द केलं असलं तरी या सामन्यात खेळणार असलेल्या सर्व खेळाडूंना मानधन देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या करंडकात खेळणाऱ्या खेळाडूंना दर दिवशी 45 हजार रुपयांचे मानधन देण्यात येतं.
बीसीसीआने ही स्पर्धा रद्द करण्यापूर्वी सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांचे मत मागवलं होतं. त्यामध्ये विजय हजारे स्पर्धा आणि विनू मंकड स्पर्धेच्या आयोजनाचा विषयही होता. बीसीसीआयच्या पत्राला उत्तर देताना बहुतेक क्रिकेट संघटनांनी बीसीसीआयच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर बीसीसीआयने रणजी सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारतात रणजी सामन्यांची सुरुवात 1934 सालापासून करण्यात आली. रणजी हे नाव क्रिकेटपट्टू रणजितसिंह यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे. तेव्हापासून आजतागायत या स्पर्धेमध्ये कोणताही खंड पडला नाही. कोरोनामुळे पहिल्यांदाच या सामन्यांच्या आयोजनात खंड पडणार आहे.