Champions Trophy 2025 : आता टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव, BCCIने केलं शिक्कामोर्तब; रोहितवर मात्र सस्पेन्स!
India VS Pakistan Champions Trophy 2025 : यंदा पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार रंगणार आहे.
ICC Champions Trophy 2025 : यंदा पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार रंगणार आहे. 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर भारताने दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने हायब्रिड मॉडेलनुसार खेळणार आहे. अलिकडेच अशी अटकळ होती की, आगामी स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) स्पर्धांमध्ये खेळाडूंनी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या देशाचे नाव असलेली जर्सी घालण्याची परंपरा आहे.
पाकिस्तानचा लोगो लावण्यास नकार दिल्याच्या वृत्तांवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपले मौन सोडले आहे. भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापले जाईल याची पुष्टी बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी बुधवारी संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास बोर्डाने आक्षेप घेतल्याच्या अटकळी फेटाळून लावल्या. त्यांनी पीटीआयला सांगितले की, "चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान जर्सीबाबत आयसीसीच्या प्रत्येक नियमाचे बीसीसीआय पालन करेल."
ते म्हणाले, "इतर संघ लोगो आणि ड्रेसशी संबंधित नियमांबाबत जे काही करतील, आम्ही त्यांचे पूर्णपणे पालन करू." पण, भारतीय कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानत जाणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. आयसीसी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व कॅप्टन एकत्र येतात, ज्यामध्ये कर्णधारांचे फोटोशूट होते. "रोहित शर्मा आयसीसी मीडिया इव्हेंटसाठी पाकिस्तानला जाणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही," असे साकिया म्हणाले.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहे. भारत हा गट अ मध्ये आहे, ज्यामध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. भारत 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल आणि 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी सामना करेल. भारताचा शेवटचा लीग सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध असेल. जर भारत पात्रता फेरीत अपयशी ठरला तर अंतिम सामना 9 मार्च रोजी लाहोर येथे होईल. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर तो दुबईमध्ये खेळवला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल.
हे ही वाचा -