शार्दूल-ईशानचा पत्ता कट, मोहम्मद शामीही संघाबाहेर, युवा खेळाडूला दिली संधी!
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test) यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test) यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील संघामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. काही अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आलेय. अजिंक्य रहाणे (Ajinkya rahane) आणि चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) यांना संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. या दोघांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झाले का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. दुसरीकडे खराब कामगिरी कऱणाऱ्या शार्दूल ठाकूर (shardul thakur) यालाही संघाबाहेर ठेवण्यात आलेय.
मोहम्मद शामी संघाबाहेर, कारण काय?
अर्जुन पुरस्कार विजेता मोहम्मद शामी याने नुकत्याच झालेल्या वनडे विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याला दुखापतीने ग्रासलं. त्यामधून तो अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे इंग्लंडविरोधात होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही. मोहम्मद शामी बेगळुरुमध्ये एनसीएमध्ये दुखापतीवर काम करणार आहे.
प्रसिद्ध कृष्णा, शार्दूलचा पत्ता कट -
अष्टपैलू शार्दूल ठाकूर याला संघात स्थान मिळवता आले नाही. मागील काही दिवसांपासून शार्दूल ठाकूर याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीत तो अपयशी ठरला. त्यामुळे निवड समितीने शार्दूल ठाकूर याला वगळण्यात आल्याचं बोललं जातेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खराब कामगिरी कऱणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा यालाही वगळण्यात आलेय.
रहाणे-पुजारा कायमचे बाहेर ?
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना पुन्हा एकदा संघात स्थान मिळवता आले नाही. पुजारा आणि रहाणे यांच्या पुढे जाऊन टीम इंडियाचा विचार केला जात असल्याचे बोलले जातेय. काही तज्ज्ञांच्या मते, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना यापुढे टीम इंडियात स्थान मिळणं कठीण आहे.
ईशानलाही वगळले -
ईशान किशन याला संघाबाहेर ठेवण्यात आलेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ईशान किशन याने मेंटल हेल्थचं कारण सांगत ब्रेक घेतला होता, पण तो दुबईत पार्ट्या करताना स्पॉट झाला. त्यामुळे बीसीसीआय ईशान किशन याच्यावर नाराज आहे. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी ईशान याला वगळण्यात आलेय. अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेतूनही ईशान किशन याला वगळण्यात आले होते.
युवा ध्रुव जुरेल याला संधी -
टीम इंडियाने कसोटीत ध्रुव जुरेल याला संधी दिली आहे. तो उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. 23 वर्षीय ध्रुव रेस्ट ऑफ इंडिया आणि अंडर 19 इंडिया अ संघासाठी खेळलाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने 15 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत, त्यामध्ये 790 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेस आहे. त्याशिवाय टी 20 क्रिकेटमध्येही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे.
इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)