PAK VS BAN 2nd Test : पाकिस्तानच्या घरात घुसून बांगलादेशनं कापलं नाक, रचला इतिहास, मालिका खिशात
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना (PAK vs BAN 2nd) रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला आहे,
Bangladesh beat Pakistan 2nd Test : बांगलादेश क्रिकेट संघाने रावळपिंडीत नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. बांगलादेशने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा 6 विकेटने पराभव केला. यासह बांगलादेशने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयात मेहंदी हसन मेराज, लिटन दास, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Bangladesh clinch their first Test series win against Pakistan 🤩#WTC25 | #PAKvBAN 📝: https://t.co/mhkrlhMLyU pic.twitter.com/hqlZbQZlOE
— ICC (@ICC) September 3, 2024
कसोटी मालिकेतील पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानला दुसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता, पण शान मसूदच्या संघाला तसे करता आले नाही. दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसात वाहून गेला. पण दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे फलंदाज फ्लॉप ठरली आणि पहिल्या डावात संघाला केवळ 274 धावा करता आल्या.
बांगलादेशचा पहिला डाव
पण बांगलादेशची पहिल्या डावात खूपच खराब सुरुवात झाली. 26 च्या धावसंख्येवर केवळ 6 विकेट पडल्या, पण त्यानंतर लिटन दास आणि मेहंदी हसन मेराजने जबरदस्त झुंज दिली. लिटन दासने 138 धावा केल्या आणि गोलंदाजीत 5 विकेट घेणाऱ्या मेहंदी हसन मेराजने 78 धावांची खेळी करत आश्चर्यकारक कामगिरी केली. बांगलादेशने 26/6 वरून थेट 262 धावा केल्या.
पाकिस्तानचा दुसरा डाव
दुसऱ्या डावातही पाकिस्तानची फलंदाजी खुपच खराब राहिली. अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, शान मसूद आणि सौद शकील हे सर्व फ्लॉप ठरले आणि संपूर्ण संघ अवघ्या 172 धावांत गारद झाला. पहिल्या डावातील 12 धावांच्या आघाडीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले.
शेवटच्या डावात बांगलादेशची तुफानी सुरुवात
चौथ्या दिवशी झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांनी बांगलादेशला तुफानी सुरुवात करून दिली, मात्र पाऊस आणि खराब हवामान बांगलादेशच्या विजयात अडथळा ठरला. आता पाचव्या दिवशी इतिहास रचण्यासाठी बांगलादेशला आणखी 143 धावा करायच्या होत्या. खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली होती, परंतु बांगलादेशने जबरदस्त कामगिरी करत चार विकेट्स गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
बांगलादेशकडून दुसऱ्या डावात झाकीर हसनने 40, शादमान इस्लामने 24, कर्णधार नझमुल हुसेन शांतोने 38 आणि मोमिनुल हकने 34 धावा केल्या. शेवटी शाकिब अल हसन 21 धावा आणि मुशफिकर रहीम 22 धावा करून नाबाद राहिले.