बाबर आझमच्या मुळावर घाव, वनडे, कसोटी अन् टी20 चं कर्णधारपद गेले
PCB decides to sack Babar Azam as captain : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने सुमार कामगिरी केली. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता आले नाही.
PCB decides to sack Babar Azam as captain : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने सुमार कामगिरी केली. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तान संघाने आठ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानले. नऊ साखळी सामन्यात पाकिस्तानला फक्त चार विजय मिळवता आले. कर्णधार बाबर आझम याला स्पर्धेत एकही मोठी खेळी करता आली नाही. त्याच्याकडून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, पण चाहत्याचा भंग झाला. नेतृत्वातही बाबर कमाल करु शकला नाही. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती. पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या खराब कामगिरीसाठी बाबर आझमला जबाबदार धरले. संघाचे माजी दिग्गज खेळाडू रमीझ राजा सुद्धा चांगलेच संतापले. रिपोर्ट्सनुसार, बाबर आझम याचे कर्णधारपद काढून घेण्यात आलेय. त्याच्याऐवजी इतर दोन खेळाडूंकडे जबाबदारी सोपण्यात आलेय. कसोटी आणि मर्यादीत षटकांसाठी वेगळे कर्णधार करण्याचा निर्णय पाकिस्तान बोर्डाने घेतला आहे.
जियो न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमकडून कर्णधारपद काढून घेणार आहे. त्याच्याजागी दोन खेळाडूंना जबाबदारी दिली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. शाहीन आफ्रिदीला टी20 संघाचे नेतृत्व देण्यात येऊ शकते. तर कसोटीची धुरा शान मसूद याच्या खाद्यांवर जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाची तयारी पाकिस्तानने सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून बाबर आझमच्या जागी शाहीन आफ्रिदीला टी20 संघाचे नेतृत्व देण्यात येणार आहे.
जियो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पीसीबी चेअरमन जका अशरफ यांनी मंगळवारी माजी कर्णधार युनिस खान आणि मोहम्मद हाफिज यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंसोबत चर्चा केली. त्यानंतर बाबर आझम याची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 16 नोव्हेंबर रोजी बाबर आझम जका अशरफ यांची भेट घेणार आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली जाऊ शकतो. दरम्यान, विश्वचषकात पाकिस्तानला अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाकडून पराभवाचा झटका बसला, त्यामुळेच सेमीफायनलमधून बाहेरचा रस्ता धरावा लागला. विश्वचषकात खराब कामगिरी झाल्यानंतर बाबर आझम स्वतच कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्तही आले होते.
बाबरची विश्वचषकातील कामगिरी -
2023 विश्वचषकात पाकिस्तान आणि बाबर आझम यांना मोठी कामगिरी करता आली नाही. बाबर आझम याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाही. बाबर आझम याने विश्वचषकात चार अर्धशतके ठोकली. पण त्यामधील तीन सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला. बाबरच्या फक्त एका अर्धशतकामुळे पाकिस्तानचा विजय झालाय. विश्वचषकातील नऊ साखळी सामन्यात बाबर आझम याने चार अर्धशतकाच्या मदतीने 320 धावा केल्या. त्यामध्ये 74 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होय. साखळी सामन्यातील नेदरलँड्सविरोधात बाबरला फक्त पाच धावा करता आल्या. श्रीलंकेविरोधात 10, भारताविरोधात 50, ऑस्ट्रेलियाविरोधात 18, अफगाणिस्तानविरोधात 74, दक्षिण आफ्रिकाविरोधात 50, बांगलादेशविरोधात 09, न्यूझीलंडविरोधात नाबाद 66 आणि इंग्लंडविरोधात 38 धावांची खेळी केली.