Ayush Mhatre Post For Rohit Sharma: रोहित शर्मामुळे मुंबईने संघातून वगळले; 17 वर्षीय आयुष म्हात्रेने केली पोस्ट, म्हणाला....
Ayush Mhatre Post For Rohit Sharma: रोहित शर्मामुळे मुंबईच्या संघातून डावलल्यानंतर आयुष म्हात्रेने एक पोस्ट केली आहे.
Ayush Mhatre Post For Rohit Sharma: रणजी क्रिकेट स्पर्धेत जम्मू-काश्मीर संघाने शानदार कामगिरीच्या बळावर अ गटाच्या सामन्यात गत विजेत्या दिग्गज मुंबई संघाला (Mumbai vs Jammu Kashmir) पाच गड्यांनी नमवून बाद फेरी जवळपास निश्चित केली. 42 वेळा रणजी विजेत्या मुंबईवर काश्मीर संघाचा हा एका दशकानंतर पहिला विजय ठरला. याआधी 2014 ला जम्मू-काश्मीरने मुंबईचा वानखेडेवर पराभव केला होता.
रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे दिग्गज संघात असून देखील मुंबईला चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माने (Rohit Sharma) तब्बल 10 वर्षांनी रणजीत पुनरागमन केले. मात्र यामध्ये देखील रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माची मुंबईच्या संघात एन्ट्री झाल्याने एका 17 वर्षाच्या आयुष म्हात्रे याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. रोहित शर्मामुळे मुंबईच्या संघातून डावलल्यानंतर आयुष म्हात्रेने एक पोस्ट केली आहे. (Ayush Mhatre Post For Rohit Sharma)
संघात स्थान न मिळाल्यानंतर आयुष म्हात्रे नेमकं काय म्हणाला?
टेलिव्हिजनवर ज्याला फलंदाजी करताना पाहून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि माझ्या आदर्शसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं हा एक अविश्वसनीय क्षण होता. पुढे घेऊन जाण्यासाठी खूप काही शिकायला मिळाले, असं आयुष म्हात्रेने फोटो शेअर करताना म्हटलं आहे. दरम्यान, आयुष म्हात्रेची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली सुरूवात झालीये. आयुषने आत्तापर्यंत पाच सामने खेळले असून त्यातील नऊ डावांमध्ये त्यानं सुमारे 36च्या सरासरीनं 321 धावा केल्या आहेत.
View this post on Instagram
मुंबईविरुद्ध जम्मू-काश्मीरचा सामना कसा राहिला?
जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर पहिल्या डावात शार्दुल ठाकूरच्या 51 धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने 120 धावा केल्या. प्रत्युत्तरात, शुभम खजुरियाच्या 53 धावांच्या खेळीच्या जोरावर जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात 206 धावा केल्या. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरने मुंबईवर 86 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरकडून उमर नझीर आणि युद्धवीर सिंग यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. यानंतर, दुसऱ्या डावात मुंबई संघाची हालत खराब होती, पण शार्दुल ठाकूरने 119 धावांची शानदार खेळी केली आणि तनुष कोटियनने संघासाठी 62 धावांची महत्वाची इनिंग खेळली. या दोन डावांच्या आधारे मुंबईने दुसऱ्या डावात 290 धावा केल्या. मुंबईला 204 धावांची आघाडी मिळाली आणि या संघाने जम्मू-काश्मीरला विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल, जम्मू आणि काश्मीरने दुसऱ्या डावात 5 गडी बाद 207 धावा केल्या आणि सामना 5 विकेट्सने विजय मिळवला.