मोठी बातमी : भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, PCB ची पाकिस्तानी खेळाडूंना मोठी शिक्षा
भारताविरुद्ध एकाही सामन्यात पाकिस्तानी संघाला विजय न मिळाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीम पाकिस्तानविरुद्ध काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

आशिया चषकात (Asia cup 2025) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे यंदाही जगाचे लक्ष लागले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता, भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तान हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे, चवताळलेल्या पाकिस्ताननेही प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशाकडे जगाचे लक्ष लागले होते. त्यातच, भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, असाही सूर यानिमित्ताने समोर आला. मात्र, बीसीसीआयने परवानगी दिल्याने अखेर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pak) सामना झाला. आशियाच चषकातील तिन्ही सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानं पाकिस्तानी चाहते आणि पीसीबी (PCB) देखील टीम पाकिस्तानावर नाराज झाली आहे.
भारताविरुद्ध एकाही सामन्यात पाकिस्तानी संघाला विजय न मिळाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीम पाकिस्तानविरुद्ध काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताविरूद्धचा पराभव जिव्हारी लागल्याने पीसीबीने टीम पाकिस्तानमधील खेळाडूंना झटका दिला असून त्यांचे अनापत्ती प्रमाणपत्र म्हणजेच (NOC) निलंबित केले आहे. पाकिस्तानी मिडिया रिपोर्ट्स अन् तेथील क्रीडा पत्रकारांकडून ही माहिती समोर आली आहे. एनओसीचा अर्थ असा आहे की, आता पाकिस्तानी खेळाडूंना देशातीलबाहेरील कुठल्याही टी-20 स्पर्धेत किंवा प्रँचाईजी लिगमध्ये सहभाग घेता येणार नाही. त्यामुळे, पाकिस्तानी खेळाडू आता विदेशातील टी-20 स्पर्धेला मुकणार आहेत.
पीसीबी अध्यक्षांच्या मंजुरीने आदेश (PCB notice issue to team Pakistan)
पाकिस्तानी न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर सुमैर अहमद सैयद यांनी 29 सप्टेंबर रोजी एक नोटीस जारी करत पाकिस्तानी खेळाडू आणि एजंटांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार, विदेशी लीग, टी-20 स्पर्धेऐवजी घरगुती क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेवर पाकिस्तानी संघाने आपला फोकस ठेवावा, असेही पत्रात म्हटले आहे. टी-20 लीग आणि इतर देशाबाहेरील टुर्नामेंटमधील सहभागासंदर्भातील पाकिस्तानी खेळाडूंच्या एनओसीला (अनापत्ती प्रमाणपत्रास) पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात येत आहे, असे पीसीबीचे अध्यक्ष यांच्या मंजूरी आदेशान्वये म्हटल्याचा उल्लेखही सबंधित नोटीसमध्ये आहे.
हेही वाचा
आधी ट्रॉफी घेऊन पळाला, आता माज उतरला; मोहसीन नक्वी BCCI ला माफी मागत काय काय म्हणाला?





















