Asia cup 2023 : शार्दुल की प्रसिद्ध? चहल की अश्विन ? कुणाची लागणार वर्णी; आशिया चषकासाठी टीम इंडियाचे शिलेदार आज ठरणार
Asia cup 2023 : जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांची निवड निश्चित मानली जातेय.
Asia cup 2023 : आशिया चषकासाठी आज भारतीय संघाची निवड होणार आहे. निवड समीतीचे अध्यक्ष अजित आगरकर दुपारी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करतील. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांची निवड निश्चित मानली जातेय. त्यांच्या जोडीला अतिरिक्त वेगवान गोलंदाज कोण? हा प्रश्न निवड समितीपुढे आहे. त्यासाठी शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि जयदेव उनादकट यांच्यामध्ये स्पर्धा आहे. आशिया चषक आणि विश्वचषकासाठी कुणाची वर्णी लागणार ? याकडे लक्ष लागलेय.
एक जागा, तीन स्पर्धक -
शार्दुल ठाकूर याने गेल्या काही वर्षांत मधल्या षटकात धारधार गोलंदाजी केली आहे. विकेट घेण्यासोबत धावा रोखण्यातही शार्दूल यशस्वी झालाय. त्याशिवाय तो तळाला फलंदाजीही करु शकतो. त्यामुळे शार्दुल ठाकूर याची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण निवड समिती प्रसिद्ध कृष्णा आणि जयदेव उनादकट यांच्या नावाचाही विचार करत आहे. प्रसिद्ध कृष्णा याने आय़र्लंड दौऱ्यातून दमदार कमबॅक केलेय. पहिल्याच सामन्यात त्याने भेदक मारा केलाय. दुसरीकडे जयदेव उनादकट याने दहा वर्षांनंतर संघात कमबॅक केलेय. शार्दुल ठाकूर याने वनडेमध्ये 58 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय अर्धशतकही ठोकलेय. तळाला तो वेगाने धावा करण्यात तरबेज आहे. त्याशिवाय मधल्या षटकात तो विकेट घेतोच. त्याशिवाय प्रतिस्पर्धी संघाची भागिदारी तोडण्यातही शार्दुलचा हातखंडा आहे. त्यामुळे एका जागेसाठी या तीन गोलंदाजांमध्ये चुरस असल्याचे दिसतेय.
अय्यर-राहुल यांच्या फिटनेसकडे लक्ष -
श्रेयस अय्यर आणि केएल राहुल दुखापतीमुळे काही दिवसांपासून संघाबाहेर आहेत. बेंगळरु येथील एनसीएमध्ये त्यांनी फिटनेसवर काम केलेय. फलंदाजी करतानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एनसीएमधील सराव सामन्यातही या दोघांनी भाग घेतला होता. राहुल पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं समोर आलेय. पण अय्यरच्या फिटनेसबाबत अद्याप संभ्रम आहे.
फिरकी गोलंदाज कोण ?
विश्वचषकासाठी पाच फिरकी गोलंदाजांमध्ये स्पर्धा आहे. अष्टपैलू रविंद्र जाडेजा, चायनामन कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्यामध्ये स्पर्धा रंगणार आहे. जाडेजा, अश्विन आणि अक्षर पटेल हे फिंगर स्पिनर आहेत. तर कुलदीप यादव चायनामन गोलंदाज आहे. लेगस्पिनगर म्हणून युजवेंद्र चहल याने दावा ठोकलाय. आर. अश्विन याच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्याचा तगडा अनुभवा आहे. त्याशिवाय तो तळाला फलंदाजीही करु शकतो. रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांचे स्थान जवळपास निश्चित आहे. उर्वरित दोन जागांसाठी तीन गोलंदाजात चुरस आहे.
आशिया चषकासाठी भारताचा संभाव्य संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर, subject to fitness), श्रेयस अय्यर (subject to fitness), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, युजवेंद्र चहल/आर अश्विन