IND vs PAK Asia Cup 2023 LIVE : विराट-राहुलची शतके, पाकिस्तानची गोलंदाजी फोडली, भारताचा 356 धावांचा डोंगर
IND Vs PAK, Innings Highlights : विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडली.
IND Vs PAK, Innings Highlights : केएल राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. राहुल आणि विराट कोहली यांनी दमदार शतके झळकावली. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके ठोकली. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात 2 विकेटच्या मोबदल्यात 356 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली 122 तर केएल राहुल 111 धावांवर नाबाद होते. पाकिस्तानची गोलंदाजी भारताच्या फलंदाजापुढे फिकी पडली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी 357 धावांचे आव्हान आहे. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी 194 चेंडूत 233 धावांची भागिदारी केली. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतकी भागिदारी केली होती.
रविवारी पावसामुळे सामना अर्धवट राहिला होता. राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली, त्यामुळे सामना उशीरा सुरु झाला. पण सामना सुरु झाल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी नाबाद द्विशतकी भागिदारी करत भारताला 356 धावांपर्यंत पोहचवले. केएल राहुल याने दमदार कमबॅक केले. केएल राहुल आणि विराट कोहली यांनी अखेरच्या 15 षटकांत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. विराट कोहलीने वनडेमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार केला. विराट कोहलीचे वनेडीत 47 वे शतकही पूर्ण झाले. विराट कोहलीने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. जम बसल्यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. केएल राहुल यानेही वादळी फलंदाजी करत शतक झळकावले. विराट कोहलीने तीन तर केएल राहुलने दोन षटकार ठोकले.
पाकिस्तानची गोलंदाजी आज कमकुवत जाणवत होती. हॅरिस रौफ दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो गोलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे गोलंदाजीची धार कमी जाणवली. शाहीन आफ्रिदी याने 10 षटकात तब्बल 79 धावा खर्च केल्या. पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
रविवारी काय झाले होतं ?
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बाबरचा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 100 चेंडूत 121 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. आजच्या दिवशाचा सामना थांबला तेव्हा विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर फलंदाजी करत होते. भारतीय संघाने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. उद्या, सोमवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उर्वरित सामना होणार आहे. रविवारी खेळ जिथे संपला तेथूनच आज सामन्याला सुरुवात होणार आहे.