Asia Cup 2023 : आशिया चषकाआधीच बांगलादेशला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज स्पर्धेबाहेर
Asia Cup 2023 : आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय. पण आशिया चषकापूर्वी बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे.
Asia Cup 2023 : आशिया चषकाला बोटावर मोजण्याइतके दिवस राहिले आहेत. प्रत्येक संघाने कसून सराव सुरु केला आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमधील आपली ताकद आशिया चषकात तपासून पाहिली जाणार आहे. कारण, आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय. पण आशिया चषकापूर्वी बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आशिया चषकात खेळू शकणार आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसैन दुखापतग्रस्त झालाय. तो आशिया चषकात भाग घेऊ शकणार नाही. शाकीब अल हसन आणि बांगलादेश संघासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आशिया चषकात बांगलादेश संघाचे नेतृत्व अनुभवी शाकीब अल हसन करत आहे.
आशिया चषकासाठी बांगलादेशने नुकतीच आपल्या 17 जणांच्या चमूची निवड केली होती. वेगवान गोलंदाज इबादत हुसैन याला बांगलादेश संघात स्थान देण्यात आले होते. पण गेल्या महिन्यात आफगाणिस्तानविरोधात झालेल्या वनडे मालिकेत हुसैन दुखापतग्रस्त झाला होता. त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आलेय. त्यामुळे आशिया चषकात हुसैन याला खेळता येणार नाही. बांगलादेश क्रिकेट मंडळाने हुसैन याच्या जागी 20 वर्षीय तंजिम हसन या वेगवान गोलंदाजाला निवडले आहे.
इबादत हुसैन विश्वचषकाआधी दुखापतीवर मात करतो का ? याकडे बांगलादेशच्या क्रीडा चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आशिया चषकात इबादत हुसैन याचा बॅकअप म्हणून तंजिम हसन याला संधी दिली आहे. तंजिम याने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवडीनंतर क्रीडा चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. दरम्यान, हुसैन याच्या अनुपस्थितीचा बांगलादेश संघाला मोठा झटका बसणार आहे. हुसैन याने भारताच्या फलंदाजांना नाकी नऊ आणले होते. भारत गतवर्षी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. त्या मालिकेत हुसैन याने तीन सामन्यात 9 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या वनडे चार विकेट घेतल्या होत्या. यामध्ये विराटकोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यासारख्या फलंदाजांचा समावेश होता. इबादत याने आतापर्यंत 14 वनडे सामने खेळले आहेत. त्याने प्रत्येक सामन्यात विकेट घेतली आहे.
आशिया चषकासाठी बांगलादेशचा संघ
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, नजमुल हुसैन शांटो, तौहिद हृदोय, मुश्फिकुर रहीम, अफीफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नासुम अहमद, मेहदी हसन, मोहम्मद नईम, शमीम हुसैन, तंजिद हसन आणि तंजिम हसन