Asia Cup 2021 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी आशिया कप स्पर्धेचं आयोजन रद्द
Asia Cup 2021 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता आशिया कप 2021 स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे. जून महिन्यात आशिया कपचं श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं होतं. सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

Asia Cup 2021 : कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अशातच कोरोनाचा क्रिकेटलाही मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक क्रिकेटच्या स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीमुळे आशिया कप (Asia Cup 2021 ) टी20 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डनं यासंदर्भात माहिती दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डनं सांगितलं की, सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आशिया कप स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे. श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी एश्ले डी सिल्वा यांनी सांगितलं की, "सध्याची परिस्थिती पाहता, यंदाच्या वर्षी जूनमध्ये होणारी आशियाई कप स्पर्धा खेळवणं शक्य नाही."
ही स्पर्धा सप्टेंबर 2020 मध्ये खेळवण्यात येणार होती. गेल्यावर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यावेळी ही स्पर्धा जून 2021 मध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान कोरोनाचा संसर्ग पाहता ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. अशातच ही स्पर्धा पुढल्या वर्षी खेळवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप यासंदर्भात आशिया क्रिकेट संघटनाच्या वतीनं अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही.
पुढल्या वर्षी आयोजन केलं जाण्याची शक्यता
आशिया क्रिकेट संघटनाने अद्याप या स्पर्धेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, मीडया रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जात आहे की, पुढच्या वर्षी आशिया कप स्पर्धेचा आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे. परंतु, स्पर्धा कुठे खेळवण्यात येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
2020 मध्ये खेळवण्यात येणाऱ्या आशिया कपचं आयोजन पाकिस्तानात करण्यात येणार होतं. परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे यंदा या स्पर्धेचं आयोजन श्रीलंकेत करण्यात येणार होतं. अशातच पाकिस्तानला पुढच्या वर्षी स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळू शकतं. किंवा पुढच्या वर्षी ही स्पर्धा दुबईत खेळवली जाऊ शकते, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
दरम्यान, भारतीय संघाच्या व्यस्त नियोजनामुळे आशिया कपवर अनिश्चिततेचं सावट होतं. भारतीय संघ जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार की, नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे आयोजकांना मोठं नुकसान झालं असतं असंही सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :




















