(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सत्ते पे सत्ता! भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विराट विजय, श्रीलंकेचा 55 धावांत खुर्दा, शामीच्या 5 विकेट्स
IND vs SL ODI World Cup 2023: रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत सलग सातवा विजय साजरा केला.
IND vs SL ODI World Cup 2023: रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत सलग सातवा विजय साजरा केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेला विजयासाठी ३५८ धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या धावांत दाणादाण उडाली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान त्रिकूटानं श्रीलंकेचा डाव धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याआधी, भारताच्या शुभमन गिलचं शतक आठ धावांनी हुकलं. सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याचं विराट कोहलीचं स्वप्नही 12 धावांनी भंगलं. पण त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 189 धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारतानं 50 षटकांत आठ बाद 357 धावांची मजल मारली.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने श्रीलंकेला अजिबात संघर्ष करण्याची संधी दिली नाही. 358 धावांचा बचाव करताना पहिल्या चेंडूपासूनच लंकेवर वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर लंकेला धक्का दिला. त्यानंतर सिराज आणि शामी यांनी सावरायची संधीच दिली नाही. भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 55 धावांवर गुंडाळत 302 धावांनी विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला.
शामी-सिराज आणि बुमराहच्या माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. लंकेचे पाच फलंदाज खातेही न उघडता तंबूत परतले. कर्णधार कुसल मेंडिस फक्त एका धावेवर बाद झाला. त्यानंतर अंझलो मॅथ्यूज याने 12 धावा केल्या. 29 धावांत लंकेचे आठ फलंदाज तंबूत परतले होते. महिश तिक्ष्णा आणि रजिथा यांनी अखेरीस थोड्याफार धावा केल्यामुळे 50 लंकेनं 50 धावसंख्या ओलांडली. तिक्ष्णा 12 धावांवर नाबाद राहिला. तर रजिथा याने 14 धावा केल्या. मधुशंका पाच धावांवर बाद झाला.
भारताकडून मोहम्मद शामीने याने पुन्हा एकदा पाच विकेट घेतल्या. पाच षटकात फक्त 18 धावा खर्च करत त्याने पाच फलंदाजांना तंबूत धाडले. सिराजनेही सात षटकात 16 धावा खर्च करत तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश -
वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग सातवा विजय होय. यंदाच्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने आपला फॉर्म कायम राखत विजय नोंदवला. भारतीय संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केलेय.
भारताने सलग सात सामन्यात विजय मिळवलाय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिले. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे.