अजिंक्य रहाणेला लॉटरी लागणार, मुंबईत 35 वर्षे पडून असलेल्या ऐवजाचा धनी होणार, बीसीसीआयच्या खजिनदाराचं म्हाडाला पत्र
Ajinkya Rahane: वांद्रे पश्चिम येथील म्हाडाच्या मालकीचा भूखंड क्रिकेट अकादमीसाठी आरक्षित आहे.
Ajinkya Rahane: मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील म्हाडाच्या मालकीचा भूखंड क्रिकेट अकादमीसाठी आरक्षित आहे. 35 वर्षानंतरही हा भूखंड तसाच आहे. माजी क्रिकेटपटू लिटील मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी वांद्रे पश्चिम येथील क्रिकेट अकादमीसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अकादमी उभारण्यास असमर्थता दर्शविल्याने याचे वितरण म्हाडाच्या मुंबई मंडळाने रद्द केले होते. आता हाच भूखंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी एका पत्राद्वारे टीम इंडियाचा खेळाडू अंजिक्य रहाणेला (Ajinkya Rahane) हा भूखंड देण्याची मागणी मुंबई मंडळाकडे केली आहे. या मागणीवर मुंबई मंडळ विचार करीत आहे. त्यामुळे हा भूखंड अजिंक्य रहाणेला मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 35 वर्षे पडून असलेल्या भूखंडाचा विकास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजिंक्य रहाणेला लॉटरी?
क्रिकेट अकादमीचा हा भूखंड जवळपास 2 हजार स्वेअर मिटर आकाराचा आहे. सुनिल गावसकर क्रिकेट फाऊंडेशनला हा भूखंड 1988 मध्ये देण्यात आला होता. मात्र 2022 मध्ये इथे आपल्याला क्रिकेट अकादमी उभारता येणार नाही असं म्हणत गावसकर यांनी अकदामीसंदर्भात असमर्थता दर्शवल्यानंतर 2022 मध्ये जून महिन्यात म्हाडाने गावसकरांना केलेलं या भूखंडाचं वितरण रद्द केलं होतं. हा भूखंड लिलावती रुग्णालयत आणि पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ आहे. येथील खासगी भूखंडाची किंमत प्रती स्वेअरफूट 50 हजार रुपये ते 1 लाख रुपयांदरम्यान आहे. त्यामुळे अगदी किमान किंमत म्हणजेच 50 हजार रुपये प्रति स्वेअर फूटने विचार केला तरी या भूखंडाची किंमत 10 कोटींच्या घरात जाते.
जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली होती नाराजी-
सुनील गावस्कर यांना क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी 35 वर्षांपूर्वी (1988 मध्ये) सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला हा भूखंड देण्यात आला होता. त्यांनी त्यावेळी क्रिकेट अकादमी सुरु करण्याची विनंती केल्यानंतर ही जमीन देण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी गेल्या वर्षांत काहीही करण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने ही जमीन जप्त करण्याची तयारी तयारी दर्शविली होती. त्यानंतर तत्कालीन (ठाकरे सरकार असताना) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
मराठमोळा अजिंक्य रहाणे-
अजिंक्य रहाणेचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील आश्वी खुर्द या लहानशा खेडेगावात झालेला आहे. त्याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी डोंबिवलीतील क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. रहाणेचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पण विशेष आहे. 2007 मध्ये पाकिस्तानच्या कराची नॅशनल स्टेडियममध्ये त्याने मुंबईसाठी पहिला सामना खेळला होता. टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात सहा चौकार मारणारा अजिंक्य रहाणे पहिलाच खेळाडू आहे. 2015मध्ये एकाच कसोटी सामन्यात त्याने आठ झेल घेतले होते. त्याचवर्षी त्याने एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक ठोकण्याची कामगिरी केली होती.