शाकिब अल हसनची लवकरच तुरुंगात रवानगी होणार?; सध्या पाकिस्तानविरुद्ध खेळतोय कसोटी सामना
Shakib Al Hasan Murder Case: पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना हरण्याच्या उंबरठ्यावर आहे.
Shakib Al Hasan Murder Case: बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शकीब अल हसन (Shakib Al Hasan) हत्येच्या आरोपावरून सध्या चर्चेत आहे. शाकिब अल हसन आपल्या आक्रमक वृत्तीमुळे अनेकदा वादांच्या भोवऱ्यात सापडतो, पण आता त्याच्याच देशात त्याच्यावर गंभीर हत्येचे आरोप झाले आहेत, ज्यासाठी त्याला तुरुंगात जावे लागू शकते. एकीकडे बांगलादेशात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी तो सध्या पाकिस्तानमध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिका खेळण्यात व्यस्त आहे.
नेमकं प्रकरण काय?
बांगलादेशची राजधानी ढाका येथील अदाबोर पोलीस ठाण्यात रफिकुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने शाकिब अल हसनविरुद्ध (Shakib Al Hasan) गुन्हा दाखल केला आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनेदरम्यान रफिकुलचा मुलगा रुबेल याचा 7 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. ढाक्यातील रिंग रोडवर झालेल्या आंदोलनादरम्यान रुबेलच्या छातीत आणि पोटात गोळ्या लागल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रफीकुल इस्लामने नमूद केलेल्या आरोपींच्या यादीत एकूण 154 जणांचा समावेश आहे. आरोपींच्या यादीत शाकिबचे नाव 28 व्या क्रमांकावर असून त्याच्याशिवाय बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद याच्यावरही हत्येचा आरोप आहे. 2023 मध्ये अवामी लीग पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आल्याने साकिबही निशाण्यावर आला आहे.
माजी पंतप्रधानांवरही आरोप-
सत्तापालट होण्यापूर्वी शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या. क्रिकेटर शाकिब अल हसन आणि इतर अनेक कलाकारांशिवाय रफिकुल इस्लामने आपल्या मुलाच्या हत्येच्या आरोपात माजी पंतप्रधान शेख हसीना यांचेही नाव घेतले आहे. सध्या 154 लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु त्यांच्याशिवाय 400-500 लोकांना देखील रुबेलच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
शाकिब अल हसनची कारकीर्द संपणार?
शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान आहेत. जेव्हा हे आरोप समोर आले तेव्हा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) एक निवेदन जारी केले की शाकिब त्याच्यावरील आरोप सिद्ध होईपर्यंत राष्ट्रीय संघातून खेळत राहील. याच कारणामुळे सध्या सुरु असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघारी बोलावण्यात आले नाही.
बांगलादेश इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर-
पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना हरण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि असे झाल्यास बांगलादेश संघ इतिहास रचेल. रावळपिंडीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत असून ही कसोटी जिंकण्यासाठी त्यांना 185 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बांगलादेश संघाने बिनबाद 42 धावा केल्या असून आता सामना जिंकण्यासाठी आणखी 143 धावांची गरज आहे, यासोबत पाहुण्या संघाकडे 10 विकेट शिल्लक आहेत. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही, त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे लवकर आटोपला. आता एक दिवसाचा खेळ बाकी असून बांगलादेशने सावध फलंदाजी केल्यास विजयासह इतिहास रचला जाईल.